आयसीसीने काही दिवसांपुर्वी एक बैठक भरवली आणि या बैठकीत ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी२० विश्वचषक स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा आयसीसीची एक बैठक झाली आणि या बैठकीत स्थगित करण्यात आलेले टी२० विश्वचषक २०२० हे २ वर्षांनंतर अर्थात २०२२ला ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पुर्वी पुढील वर्षी (२०२१) भारतात टी२० विश्वचषक खेळण्यात येणार आहे.
अशात, जे क्रिकेटपटू त्यांचे वय झाल्यामुळे निवृत्ती घेण्याच्या विचारात होते, ते क्रिकेटपटू त्यांचा निवृत्तीचा निर्णय मागे घेऊ शकतात. कारण प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की, त्याने क्रिकेटमधून निवृत्त होण्यापुर्वी आपल्या संघाला एक तरी विश्वचषक जिंकून द्यावा आणि हेच स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने दिग्गज क्रिकेटपटू अजून १-२ वर्षे आपापल्या संघाकडून खेळतील. थोडक्यात अनेक क्रिकेटपटूंना टी२० विश्वचषक २०२० पुढे ढकलण्यात आल्यामुळे अजून १-२ वर्षे क्रिकेट खेळण्याचा फायदा झाला आहे.
या लेखात, २०२० सालचे टी२० विश्वचषक रद्द झाल्यामुळे अजून १-२ वर्षे क्रिकेट कारकीर्द वाढलेल्या खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे.
टी२० विश्वचषक २०२० रद्द झाल्यामुळे क्रिकेट कारकीर्द वाढलेले पाच क्रिकेटपटू (5 Cricketers Benefited Due To T20 World Cup 2021) –
मोहम्मद हाफिज (पाकिस्तान)
मोहम्मद हाफिज अनेक वर्षांपासून पाकिस्तान संघाचा भाग आहे. आता त्याचे वय ४० वर्षांच्या आसपास झाले आहे. हाफिजने आधीच घोषणा केली होती की, टी२० विश्वचषक २०२०मध्ये खेळल्यानंतर तो क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. पण आता हेच विश्वचषक २ वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे हाफिजला क्रिकेट खेळण्यासाठी अजून एक वर्षे मिळाले आहे. कदाचित तो पुढील वर्षीचा भारतातील टी२० विश्वचषक खेळून निवृत्त होऊ शकतो.
२००३ पासून हाफिजने पाकिस्तानकडून ५५ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ३६५२ धावा आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत हाफिजने २१८ सामने खेळत ६६१४ धावा आणि १३९ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे, तर टी२० क्रिकेटमध्येही आपल्या अष्टपैलू प्रदर्शनाने हाफिजने पाकिस्तान संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याने ९१ टी२० सामन्यात १९९२ धावा आणि ५४ विकेट्स घेतल्या आहेत.
लसिथ मलिंगा (श्रीलंका)
श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने या गोष्टीची घोषणा केली होती की, तो २०२० विश्वचषकानंतर निवृत्ती घेईल. पण, आता टी२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे मलिंगाची क्रिकेट कारकीर्द २०२१पर्यंत वाढू शकते. तो पुढील वर्षी भारतात होणारा टी२० विश्वचषक खेळून निवृत्तीची घोषणा करु शकतो.
मलिंगा टी२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने सप्टेंबर २०१९ रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात सलग ४ चेंडूत ४ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. त्याच्या गोलंदाजीपुढे जगातील मोठ-मोठे फलंदाज त्यांचे पाय टेकतात. मलिंगाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी पाहिली तर, त्याने कसोटीत ३० सामन्यात १०१ विकेट्स, वनडेत २२६ सामन्यात ३३८ विकेट्स आणि टी२०त ८३ सामन्यात १०७ विकेट्स घेतल्या आहेत.
ड्वेन ब्रावो (वेस्ट इंडिज)
वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोने ऑक्टोबर २०१८ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु, डिसेंबर २०१९मध्ये त्याने निवृत्तीतून माघार घेतली आणि तो वेस्ट इंडिज टी२० संघाचा भाग आहे. ब्रावो फीट आहे आणि तो अजून २-३ वर्षे क्रिकेट खेळू शकतो. आता टी२० विश्वचषक २०२० पुढे ढकलले गेले आहे, त्यामुळे ब्रावो नक्कीच टी२० विश्वचषक २०२१ चा भाग असेल.
ब्रावो जगभरातील अनेक टी२० लीगमध्ये खेळतो. त्यामुळे त्याला टी२० स्पेशलिस्ट असे संबोधले जाते. ब्रावो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात दमदार प्रदर्शन करण्याची क्षमता राखतो. त्याने वनडेत १६४ सामने खेळत २९६८ धावा आणि १९९ विकेट्स घेतल्या आहेत. तर, टी२० क्रिकेटमध्ये ७१ सामन्यात त्याने ११५१ धावा आणि ५९ विकेट्स घेतल्या आहेत.
केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नव्हे तर, कसोटी क्रिकेटमध्येही ब्रावोने अष्टपैलू भूमिका बजावली आहे. त्याने ४० कसोटी सामने खेळत २२०० धावा आणि ८६ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजी, गोलंदाजी याबरोबरच ब्रावो क्षेत्ररक्षणातही माहिर आहे.
शोएब मलिक (पाकिस्तान)
शोएब मलिक हा ओव्हर ऑल टी२० क्रिकेटमध्ये ९०००पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू आहे. त्यामुळे पाकिस्तान संघ त्याला टी२० विश्वचषकात नक्की सामील करेल. ३८ वर्षीय शोएबला टी२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आले असले तरी, पाकिस्तान संघ त्याला निवृत्ती घेण्यापासून थांबवू शकतो. त्यामुळे पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब भारतात होणारे टी२० विश्वचषक २०२१ खेळून निवृत्त होऊ शकतो.
शोएबची वनडे आणि टी२० क्रिकेटमधील आकडेवारी उल्लेखनीय आहे. त्याने २८७ वनडे सामने खेळत ७५३४ धावा आणि ११३ टी२० सामने खेळत २३२१ धावा केल्या आहेत. तसेच, कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ३५ सामने खेळत १८९८ धावा केल्या आहेत.
एमएस धोनी (भारत)
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज आता ३९ वर्षाचा झाला आहे. गतवर्षीच्या विश्वचषकातील सामन्यानंतर एमएस धोनी क्रिकेट खेळताना दिसला नाही. मात्र, धोनी टी२० विश्वचषक २०२०मध्ये भारतीय संघाचा भाग असेल, त्यानंतर तो क्रिकेटमधून निवृत्ती घेईल असे म्हटले जात होते. पण, विश्वचषक पुढे ढकलले गेल्यामुळे धोनीची कारकीर्दही एका वर्षासाठी वाढली आहे. तो टी२० विश्वचषक २०२१ खेळून निवृत्ती घेईल.
२००४ ते २०१९ या कालावधीत धोनीने भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्याने भारताकडून ९० कसोटी सामने खेळत ४८७६ धावा केल्या आहेत, तर त्याने वनडेत ३५० सामने खेळत १०७७३ धावा केल्या आहेत. टी२० क्रिकेटमध्ये त्याने १६१७ धावा केल्या आहेत. सोबतच धोनीने यष्टीरक्षणातही दमदार भूमिका बजावली आहे.
ट्रेंडिंग लेख –
-इंग्लंडमधील काऊंटीच्या फॉर्मच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवणारा संकटमोचक क्रिकेटर
-हैराण करणारा विक्रम! आयपीएलमध्ये ४८ चेंडू खेळून एकही चौकार मारु न शकलेले क्रिकेटर
-बीसीसीआयच्या दबावामुळे ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर लवकरच करणार क्रिकेटला टाटा बाय बाय