निवृत्ती हा प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. ती प्रत्येक खेळाडूला कधी ना कधी घ्यावी लागते. पण असे काही खेळाडू आहेत ज्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आणि काही काळ क्रिकेट खेळले देखील. पण असे निवृत्तीनंतर मैदानात पुनरागमन करणारे सर्वच खेळाडू यशस्वी ठरले असे नाही तर काही खेळाडूंना अपयशाचा सामना करावा लागला.
नुकताच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने टी-२० क्रिकेटमधून मैदानात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एबी डेव्हिलियर्स देखील पुन्हा दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता खरंच हे खेळाडू पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार का हे पाहावे लागेल.
या लेखात अशा ५ खेळाडूं चा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी निवृत्तीनंतर मैदानात पुनरागमन केले परंतु ते अपयशी ठरले. जाणून घेऊया त्या ५ खेळाडूंबद्दल..
१. फ्रेड टूरुमन
इंग्लंड क्रिकेट इतिहासातील सर्वात महान वेगवान गोलंदाज फ्रेड टूरुमन हे कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळी घेणारे पहिले गोलंदाज होते. फ्रेड टूरुमनने आपल्या घातक गोलंदाजीने त्याच्या काळातील जवळपास सर्व फलंदाजांना त्रास दिला.
महान वेगवान गोलंदाज फ्रेड टूरुमनने १९६८ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चॅम्पियनशिप जिंकून निवृत्ती घेतली. कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियावर हा एक सर्वात मोठा आणि मोलाचा विजय होता.
त्यानंतर १९७२ मध्ये डर्बीशायरकडून टूरुमन प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुन्हा परतले. त्यावेळी फ्रेड टूरुमन आपली प्रभावी गोलंदाजी करण्यात अपयशी ठरले आणि ६ सामन्यात केवळ ७ बळी मिळवू शकले.
२. मार्टिन क्रो
न्यूझीलंड क्रिकेटचा महान क्रिकेटपटू मार्टिन क्रो त्याच्या काळातील सर्वात यशस्वी फलंदाज होता. मार्टिन क्रोने ७७ कसोटी सामन्यांमध्ये ४५.३६ च्या सरासरीने ५४४४ धावा केल्या. १९९५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले मार्टिन क्रो वयाच्या ४८ व्या वर्षी २०११ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये परतला, २०११ मध्ये क्रो ऑकलंडमध्ये एका क्लब क्रिकेट सामन्यात खेळताना दिसला होता.
१९९५ मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला क्रो पुनरागमनानंतर पूर्णपणे अपयशी ठरला. नंतर कर्करोगासारख्या भयंकर आजारामुळे ३ मार्च २०१६ रोजी क्रोचा मृत्यू झाला.
३. व्हॅली हॉन्ड
इंग्लंड क्रिकेटचा सर्वात यशस्वी फलंदाज, व्हॅली हॉन्ड कसोटी क्रिकेटमधील एक यशस्वी फलंदाज होते. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, व्हॅली हॉन्ड यांनी ८५ कसोटी सामन्यांमध्ये ५८.४८ च्या सरासरीने ७२४९ धावा केल्या, तर कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी देखील त्यांनी केली आणि ८३ बळी घेतले.
व्हॅली हॉन्डने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५६.१९ च्या सरासरीने ५०४९३ धावा केल्या त्या दरम्यान त्यांनी १६७ शतकेही ठोकली. तसेच ३०.५८ च्या सरासरी गोलंदाजीने ७३२ बळीही मिळवले.
ब्रॅडमन यांचे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण होण्याआधी व्हॅली हॉन्ड हे जगातील सर्वात महान फलंदाज होते, १९४७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या व्हॅली हॉन्ड १९५० मध्ये एमसीसी संघाकडून तीन दिवसीय प्रथम श्रेणी सामन्यातून क्रिकेटमध्ये परतले. या सामन्यात व्हॅली हॉन्डने १५ आणि नाबाद ९२ धावा केल्या.
व्हॅली हॉन्ड यांनी १९५१ च्या ग्लॉस्टरशायर संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि ते केवळ ७ धावांवर बाद झाले.
४. जॉर्ज हेडली
वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटपटू जॉर्ज हेडली हे कसोटी क्रिकेटमध्ये २२ पेक्षा जास्त सामने खेळले असते तर त्यांनी अनेक विक्रम मोडले असते, परंतु जॉर्ज हेडली यांनी फक्त २२ कसोटी सामने खेळले आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये ६०.८३ च्या सरासरीने धावा करणाऱ्या जॉर्ज हेडली यांची प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सरासरी ६९.८६ होती.
त्यांच्या शानदार खेळासाठी ते “ब्लॅक ब्रॅडमन” म्हणून ओळखले जात होते. बरेच दिवस क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर जॉर्ज हेडली १९५४ मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये परतले. या सामन्यात जॉर्ज हेडली केवळ १७ धावा करू शकले, या अयशस्वी पुनरागमनमुळे जॉर्ज हेडलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली.
५. सनथ जयसूर्या
विश्व क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वनडे अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेल्या, सनथ जयसूर्याने वयाच्या ४१ व्या वर्षी २०११ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यात पुनरागमन केले.
डावखुरा सलामीवीर जयसूर्या ओव्हलमधील पहिल्या वनडे सामन्यात केवळ २ धावांवर झेलबाद झाला. सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या जयसूर्यासाठी हा सामना त्यांचा फेअरवेल सामना ठरला.
जयसूर्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० हून अधिक धावा केल्या आणि ४०० हून अधिक बळी मिळवले आहेत. जयसूर्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४२ शतकेही केली आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-जगभरात भारतासारखे क्रिकेट वेडे फॅन्स शोधून सापडणार नाहीत, जाणून घ्या या पाठीमागची ५ कारणं
-खेलरत्न पुरस्कारासाठी पात्र होते हे ४ भारतीय दिग्गज क्रिकेटर, पण नाही मिळाला हा सन्मान
-एमएस धोनीने विराट कोहलीला दिले हे ५ मॅच विनर खेळाडू
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नई सुपरकिंग्सचा हा दिग्गज खेळाडू दुसऱ्यांदा झाला पिता
-विराटच्या आरसीबीसेनेचा प्लॅन तयार; ‘या’ दिवशी होणार यूएईला रवाना
-मुंबई- चेन्नईपुर्वीच आयपीएलचे हे ३ संघ दुबईत दाखल, ६ दिवस होणार क्वारंटाईन