कसोटी क्रिकेटनंतर आलेले वनडे क्रिकेट हे अतिशय लोकप्रिय ठरले. आयसीसीने याच प्रकारातील पहिला विश्वचषक व ज्याला मिनी वर्ल्डकप म्हणतात त्या आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्राॅफीची सुरवात केली. कर्णधार यशस्वी ठरला की नाही हे पहाण्यासाठी त्याने विश्वचषक जिंकला की नाही ही परिमाण लावली जाऊ लागली.
त्यामुळे खरे क्रिकेट जरी कसोटी प्रकारात असले तरी लोकप्रिय क्रिकेट मात्र आजही वनडे क्रिकेटचं आहे. आज टी२० क्रिकेटच्या जमान्यातही वनडे क्रिकेटच्या लोकप्रियतेत काहीही फरक पडला नाही. यामुळे या क्रिकेटमध्ये कर्णधारांच्या कामगिरीवरही तमाम क्रिकेटप्रेमींच लक्ष असतं.
या लेखात आपण सर्वाधिक वनडे सामने जिंकलेले कर्णधार पाहणार आहोत. (5 ODI captains with highest win)
५. स्टिफन फ्लेमिंग
१९९७ ते २००७ या काळात स्टिफन फ्लेमिंगने न्यूझीलंड वनडे संघाचे कर्णधारपद सांभाळले. त्याने या काळात तब्बल २१८ सामन्यात संघाचे नेतृत्त्व केले. सर्वाधिक सामन्यांत संघाचे नेतृत्त्त्व करण्याचा विक्रम त्याच्या नावावर २०११ पर्यंत होता. पुढे रिकी पाॅटींगने हा विक्रम मोडला तो भाग वेगळा.
फ्लेमिंगने या २१८ नेतृत्त्व केलेल्या सामन्यात न्यूझीलंडने ९८ विजय मिळवले तर १०६ पराभव पाहिले. १ सामना टाय झाला तर १३ सामन्यांचा काही कारणाने निकाल लागु शकला नाही. फ्लेमिंगची विजयाची टक्केवारी ही वनडेत ४८.०४टक्के राहिली. वनडेत १०० पराभव पाहिलेला तो एकमेव कर्णधार आहे.
४. हॅन्सी क्रोनिये
अनेक क्रिकेट तज्ञांच्या मते क्रोनिये हा जगातील आजपर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार होता. तो लोकांना खेळाडूपेक्षाही एक कर्णधार म्हणून जास्त माहित होता. तो कर्णधार असताना लोकप्रियतेच्या शिखरावर होता. मार्च २००२ला वनडे सामना खेळल्यानंतर जुन २००२ला तो वयाच्या ३२व्या वर्षी विमान अपघातात मृत्युमुखी पडला.
१९९२ ते २००० या काळात क्रोनियेच्या दक्षिण आफ्रिका संघाचा जगात दरारा होता. १८८ वनडे खेळलेल्या क्रोनियेने १३८ सामन्यांत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्त्व केले. त्यात आफ्रिकेने ९९ विजय मिळवले व केवळ ३५ पराभव पाहिले. एक सामना टाय तर ३ सामने अनिर्णित राहिले. ७३.७० टक्केवेळा तो कर्णधार असताना आफ्रिकेने विजय मिळवला.
३. अॅलन बाॅर्डर
ऑस्ट्रेलियाचे महान कर्णधार अॅलन बाॅर्डर यांनी १९८५ ते १९९४ या काळात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या वनडे कर्णधारपदाची धुरा सांभाळली. २७३ वनडे सामने खेळलेल्या बाॅर्डर यांनी १७८ वनडेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व केले. यात त्यांनी संघाला १०७ विजय मिळवुन दिले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाने ६७ पराभव पाहिले तर ३ सामने अनिर्णित व १ सामना टाय झाला. त्यांची वनडे जिंकण्याची टक्केवारी ही ६१.४२ टक्के राहिली.
२. एमएस धोनी
भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन कूल अशी ओळख असलेला एमएस धोनी त्याच्या विशिष्ट शैलीमुळे कायमच क्रिकेट वर्तुळात चर्चिला जातो. ज्यावेळा भारतीय संघात मोठं-मोठे खेळाडू होते तेव्हा त्यांच्याऐवजी धोनीकडे नेतृत्त्वाची धुरा देण्यात आली. त्यानेही आपण किती योग्य कर्णधार होतो हे पुढे दाखवुन दिले.
धोनीने भारताकडून ३५० वनडे सामने खेळले. यातील २०० सामन्यात त्याने २००७ ते २०१८ या काळात संघाचे नेतृत्त्व केले व ११० सामने यातील टीम इंडियाने जिंकले. ५ सामने टाय तर ११ सामने अनिर्णित राहिले. त्याची विजयाची टक्केवारी ५९.९२ एवढी चांगली राहिली. जगात केवळ तीन कर्णधारांना १००पेक्षा जास्त वनडे सामने जिंकता आले व त्यात दुसऱ्या स्थानी आहे. २००सामने संघाचं नेतृत्त्व करणारा धोनी हा तिसराच खेळाडू आहे.
१. रिकी पाॅटींग
रिकी पाॅटींग आणि विजय हे एकेवेळीच लोकप्रिय समीकरण होतं. तो केवळ एक चांगला कर्णधार नव्हता तर त्याहुन चांगला एक फलंदाजही होता. सामना एकहाती फिरविण्याची ताकद पाॅटींगकडे होती.
वनडे कारकिर्दीत ३७५ वनडे खेळलेल्या पाॅटींगने २३० सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व केले. त्याने २००२ ते २०१२ या ११ वर्षांत वनडेत तब्बल १६५ विजय मिळवले. यात ५१ पराभव, २ सामने टाय व १२ सामने अनिर्णित राहिले. तो वनडेत कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणारा व जिंकणारा खेळाडू आहे. त्याची जिंकण्याची टक्केवारी ही ७६.१४ टक्के राहिली आहे.
विराट कुठे?
विराटने ८९ सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्त्व केले असून त्यात ६२ विजय मिळवले आहेत. विराटची जिंकण्याची टक्केवारी ही ७१.८३ आहे. विराटला पहिल्या ५ खेळाडूंमध्ये येण्यासाठी कमीतकमी अजूनही ३६ विजयांची गरज आहे.
आकडेवारीवर आधारीत काही मनोरंजक लेख-
–२५०पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही या ५ खेळाडूंवर कर्णधारपद कायम रुसलेच
–टाॅप ५- वयाची २३ वर्ष पुर्ण करण्यापुर्वीच कसोटी कर्णधार झालेले खेळाडू
–सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे ५ कर्णधार
–टाॅप ५- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले दिग्गज
–टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी
–सध्या खेळत असलेले ५ खेळाडू ज्यांनी मिळविल्या आहेत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच
–टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब
–टाॅप १०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू