न्यूझीलंड संघाने भारतला पराभूत करत जागतिक कसोटी अजिंक्यपदावर आपले नाव कोरले आहे. न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला. यामुळे कसोटी क्रिकेटला आपला पहिला विश्वविजेता संघ मिळाला आहे
या सामन्याच्या अंतिम दिवशी भारताला दुसऱ्या डावात केवळ १७० धावा करता आल्या होत्या. तसेच पहिल्या डावातील ३२ धावांच्या पिछाडीमुळे भारताने न्यूझीलंडला केवळ १३९ धावांचे आव्हान दिले. भारताकडून दुसऱ्या डावात रिषभ पंतने सर्वाधिक ४१ धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंड गोलंदाजांमधून टीम साऊदीने सर्वाधिक ४ बळी घेतले होते. १३९ धावांचे लक्ष्य न्यूझीलंड संघाने २ गडी गमावून ४५.५ षटकांत सहज पूर्ण केले व जागतिक कसोटी अजिंक्यपदाची मानाची गदा मिळवली. कर्णधार केन विलियम्सन ५२ धावा करत नाबाद राहिला.
तत्पूर्वी भारताचा पहिला डाल २१७ धावांवर संपुष्टात आला होता. तर न्यूझीलंडने २४९ धावा पहिल्या डावात केल्या होत्या. या संपूर्ण स्पर्धेत न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसनची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्याने या सामन्यात ७ विकेट्स घेण्याबरोबरच पहिल्या डावात २१ धावाही केल्या. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
असे असले तरी या सामन्यात गेल्या अनेक वर्षांपासून कसोटीमध्ये दबदबा निर्माण करणाऱ्या भारतीय संघाकडून सर्वांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, भारतीय संघ या अंतिम सामन्यात जवळपास सर्वच विभागात अपयशी ठरला. भारताच्या पराभवामागे नक्की काय कारणे आहेत, याचा आढावा या लेखातून घेऊ.
भारताच्या पराभवामागची ५ कारणे
१. एकाही भारतीय फलंदाजाने केले नाही अर्धशतक
अंतिम सामन्यात कोणताही भारतीय फलंदाज अर्धशतक ठोकू शकला नाही. पहिल्या डावात अजिंक्य रहाणेने ४९ धावा केल्या. दुसर्या डावात पहिल्या पाच फलंदाजांपैकी कोणालाही ४० धावांचा टप्पा गाठता आला नाही. दुसरीकडे न्यूझीलंडकडून पहिल्या डावात तीन फलंदाजांनी ३० हून अधिक धावा केल्या. त्यात एक अर्धशतकही होते. दुसऱ्या डावातही न्यूझीलंडकडून विलियम्सनने एक अर्धशतक ठोकले.
२. जसप्रीत बुमराह अपयशी
भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहकडे पाहिले होते. त्याला पहिल्या डावात एकही विकेट घेता आली नाही. दुसऱ्या डावातही तो प्रभावी दिसत नव्हता आणि विकेट घेऊ शकला नाही. दुसरीकडे न्यूझीलंडचे मुख्य वेगवान गोलंदाज टीम साऊदी , नील वॅग्नर, काइल जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट यांनी चांगली गोलंदाजी केली. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय संघाचे दोन्ही डावात मिळून सर्व २० विकेट घेतल्या.
३. भारताचे तळातील फलंदाज अपयशी
भारताच्या तळातील फलंजांनाही या सामन्यात फार काही करता आले नाही. अखेरच्या ४ विकेटसाठी केवळ ३५ धावा पहिल्या डावात भारताच्या तळातील फलंदाजांनी जोडल्या. तर दुसऱ्या डावात त्यांना केवळ २८ धावाच करता आल्या. दुसरीकडे, न्यूझीलंडच्या तळातील फलंदाजांनी अखेरच्या ४ विकेटसाठी पहिल्या डावात तब्बल ८७ धावांची भर घातली. या धावा भारताच्या तळातील फलंदाजांनी दोन्ही डावात मिळून केलेल्या धावांपेक्षाही अधिक होत्या.
४. भारताने केवळ ३ वेगवान गोलंदाजांना दिली संधी
या सामन्यात न्यूझीलंडचा संघ वातावरणाचा अंदाज घेऊन कोणत्याही फिरकी गोलंदाजांसह उतरला नव्हता. त्यांनी ५ वेगवान गोलंदाज खेळवले होते. दुसरीकडे भारतीय संघाने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाज खेळवले होते. पण भारताची रणनीती अपयशी ठरली. संपूर्ण सामन्यात फिरकी गोलंदाज केवळ पाच विकेट घेऊ शकले. तर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना फलंदाजीद्वारे चमत्कार करता आले नाही.
५. अखेरच्या दिवसाचे कमकुवत नियोजन
अखेरच्या दिवशी भारतीय संघात नियोजनाची कमी होता. जणू काही धावा करायच्या की विकेट वाचवायचे हे फलंदाजांना ठाऊक नसल्यासारखे दिसत होते. यामुळे संघाला धावा करता येईना आणि त्यामुळे नियमित कालांतराने विकेट गमावाव्या लागल्या. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दोन्ही डावात कुशलतेने फलंदाजी केली. विशेषत: कर्णधार केन विल्यमसनने एक टोक धरून ठेवले होते.
महत्वाच्या बातम्या
कसोटी चँपियनशीप पराभवानंतरही कर्णधार विराट म्हणतोय, ‘माझ्या हा निर्णय योग्यचं होता’
‘विलियम्सन आणि कंपनी’ची कसोटी जेतेपदावर मोहोर, चॅम्पियन कर्णधाराने दिली पहिली प्रतिक्रिया
ऐतिहासिक लढतीचे नायक! आयसीसीच्या पहिल्यावहिल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘हे’ ठरलेत सामनावीर