कसोटी क्रिकेटमध्ये नाईटवॅचमनला स्वतःचे वेगळे महत्त्व असते. एका दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी एखाद्या संघाने आपली विकेट गमावली तर कर्णधार मुख्य फलंदाजाऐवजी खालच्या फळीतील फलंदाज फलंदाजीसाठी पाठवतो, जेणेकरून दिवसाच्या शेवटच्या षटकांमध्ये संघाला आणखी कोणताही मोठा धक्का बसू नये. साधारणत: कसोटी क्रिकेटमध्ये नाईटवॅचमन मोठ्या धावा करू शकत नाहीत, पण असे अनेक प्रसंग घडले जेव्हा नाईटवॅचमनने अपेक्षेपेक्षा जास्त धावा करून शतकही ठोकले.
कसोटी क्रिकेटमध्ये नाईटवॉचमनने शतक झळकावले असे आतापर्यंत ६ वेळा झाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या जेसन गिलेस्पीने नाईटवॉचमन म्हणून दुहेरी शतकही झळकावले असून हा विक्रम करणारा तो एकमेव खेळाडू आहे.
जाणून घेऊया ते ६ प्रसंग, जेव्हा नाईटवॅचमनने शतक झळकावून सर्वांना चकित केले-
१. जेसन गिलेस्पी (नाबाद २०१ धावा)
२००६ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या चटगांव कसोटीत जेसन गिलेस्पी नाईटवॅचमन म्हणून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने २०१ धावांची शानदार खेळी करून सर्वांना चकित केले. जेसन गिलेस्पीच्या दुहेरी शतकाच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने (५८१/४) बांगलादेशला (१९७ आणि ३०४) पराभूत केले. योगायोगाने, तो जेसन गिलेस्पीच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामनादेखील होता.
२. मार्क बाउचर (१२५ धावा)
१९९५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या हरारे कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर नाईटवॅचमन म्हणून फलंदाजीला आला आणि त्याने शानदार १२५ धावा फटकावल्या. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (४६२/९) झिम्बाब्वेला (१०२ आणि १४१) एक डाव आणि २१ धावांनी पराभूत केले.
३. मार्क बाउचर (१०८ धावा)
१९९९ मध्ये डरबन येथील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात मार्क बाऊचरने पुन्हा हा विक्रम केला. इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या ३६६/९ धावांच्या उत्तरात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव केवळ १५६ धावांवर संपला, परंतु फॉलोऑन नंतरच्या डावात गॅरी कर्स्टनच्या २७५ धावांच्या शानदार खेळीमुळे ५७२/७ धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला. त्याच डावात बाऊचरने नाईटवॉचमन म्हणून १०८ धावा केल्या होत्या.
४. टोनी मान (२०५ धावा)
ऑस्ट्रेलियाच्या टोनी मानने १९७७ मध्ये भारत विरुद्ध पर्थ कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात नाईटवॅचमन म्हणून शानदार शतक झळकावले आणि संघाच्या विजयासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. ऑस्ट्रेलियाने हा सामना टोनी मान यांच्या खेळीने दोन गडी राखून जिंकला. भारताने पहिल्या डावात ४०२ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ३९४ धावा केल्या. भारताने आपला दुसरा डाव ३३०/९ धावांवर घोषित केला, त्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने टोनी मानच्या शतकी खेळीच्या जोरावर आठ गडी गमावून ३३९ धावांचे लक्ष्य गाठले आणि सामना जिंकला.
५. सय्यद किरमानी (नाबाद १०१ धावा)
सय्यद किरमानी १९७९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यात भारताच्या एका डावात नाईटवॅचमन म्हणून फलंदाजीला आले आणि त्यांनी १०१ धावांची नाबाद खेळी केली. त्या कसोटीत भारताने (४५८/८) ऑस्ट्रेलियाला (१६० आणि १९८) एक डाव आणि १०० धावांनी पराभूत केले.
६. नसीम-उल-घनी (१०१ धावा)
१९६२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स टेस्टमध्ये पाकिस्तानच्या नसीम-उल-गनीने नाईटवॉचमन म्हणून दुसर्या डावात १०१ धावा केल्या. त्या सामन्यात इंग्लंडने (३७० आणि ८६/१) पाकिस्तानचा (१०० आणि ३५५) ९ गडी राखून पराभव केला. घनी यांच्या शतकी खेळीच्या मदतीने डावाचा पराभव मात्र टाळला.
महत्त्वाच्या बातम्या –
जे सॅमसन अन् वॉटसनला जमलं नाही, ते राजस्थानसाठी बटलरने करून दाखवलं! पाहा पठ्ठ्याची खास कामगिरी