भारतीय क्रिकेट संघातील चौथ्या क्रमांकाची जागा ही मागील २-३ वर्षांपासून विशेषत: वनडे क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय आहे. युवराजसिंगने संघातील स्थान गमावल्यापासून अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि अंबाती रायुडू असे अनेक खेळाडू या जागेवर खेळले आणि काही प्रमाणात चांगले प्रदर्शन सुद्धा केले.
मागील दोन वर्षात विजय शंकर,रिषभ पंत, केएल राहुल आणि एमएस धोनी यांनीही चौथ्या क्रमांकावर आपले हात आजमावले. परंतु, त्याआधीच्या फलंदाजांप्रमाणे त्यांना सलग पुरेश्या संध्या मिळाल्या नाहीत. सध्या, श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर मर्यादित संधींमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत एकदिवसीय क्रिकेटमध्येही या स्थानाला स्वत:चे स्थान बनविलेले दिसते आहे.
भारताला याआधी कधी, फलंदाजीच्या बाबतीत, अशा समस्येचा सामना करावा लागला नव्हता. देशातील एकाहून एक सरस फलंदाजांच्या उपलब्धतेमुळे भारताची फलंदाजी कायम सुदृढ असत.
या लेखात आपण, वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा केलेल्या तीन फलंदाजांनी विषयी जाणून घेऊया.
राहुल द्रविड (३,३०१ धावा)
कसोटीचा दिग्गज असा शिक्का बसलेला भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड हा वनडे क्रिकेटचा ही तितकाच दिग्गज होता. राहुल द्रविडचा नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०,००० पेक्षा जास्त धावा आहेत.
कसोटीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा द्रविड वनडेमध्ये १०८ सामने चौथ्या क्रमांकावर खेळला. या १०८ सामन्यांत त्याने ३६.२७ च्या शानदार सरासरीने ३,३०१ धावा फटकावल्या आहेत.
द्रविडने चौथ्या क्रमांकावर २६ अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ७०.९१ चा राहिला तर ११ तो नाबाद राहत तंबूत गेला.
कसोटीप्रमाणे, वनडेमध्ये देखील त्याचा आवडता क्रमांक तीन राहिला. तिसऱ्या क्रमांकावर त्याने १०९ डावात सात शतकांच्या मदतीने ४००० धावा पूर्ण केल्या आहेत.
युवराज सिंग ( ३,४१५)
भारताच्या २०११ च्या विश्वचषक विजयाचा शिल्पकार युवराज सिंग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या वनडे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २७८ सामने खेळलेल्या युवराज सिंगचा हा आवडीचा क्रमांक होता. युवराज सिंगच्या नावे ८,७०१ वनडे धावा जमा आहेत
अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावणाऱ्या युवराजने भारतीय संघासाठी १०८ डावांमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. यामध्ये त्याने ३५.२१ च्या सरासरीने ३,४१५ धावा काढल्या आहेत. १०८ डावांदरम्यान युवराजने १७ अर्धशतके व ६ शतकांची नोंद केली.
युवराजच्या वनडे कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी (१५०) ही सुद्धा चौथ्या क्रमांकावर आली आहे. २०१७ मध्ये कटक येथे त्याने ही खेळी साकारली.
मोहम्मद अजहरुद्दिन ( ४,६०५)
सलग तीन विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणारा भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हा चौथ्या क्रमांकावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. अझरुद्दीन हा भारतासाठी कायमस्वरूपी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत.
चौथ्या क्रमांकावर १३७ सामन्यांमध्ये फलंदाजी करत अझरुद्दीनने ४०.३९ च्या उत्कृष्ट सरासरीने ४,६०५ धावा चोपल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ७७.५८ राहिला. या महत्त्वाच्या जागेवर फलंदाजी करत असताना त्याने ३३ अर्धशतकांसोबतच ३ शतके सुद्धा झळकावली आहेत.
चौथा क्रमांक आपलासा करत अझरुद्दीनने, युवराज पेक्षा हजाराहून जास्त धावा या क्रमांकावर केल्या आहेत. अझरुद्दीनची सर्वांच्च खेळी (१५३*) सुद्धा क्रमांक चार वर आली आहे.