इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात शनिवारी (२६ मार्च) पार पडला. या सामन्यात कोलकाताने ६ विकेट्सने विजय मिळवला. विशेष म्हणजे, आयपीएलच्या पहिल्या सामन्यापूर्वीच एमएस धोनीने कर्णधारपद सोडले. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला चेन्नईचा नवीन कर्णधार म्हणून नेमले. जडेजाला ही जबाबदारी मिळाल्यानंतर त्याची पत्नी रिवाबा सोलंकीने आनंद व्यक्त केला आहे. तसेच, तिने धोनीला धन्यवादही दिला आहे.
रिवाबा सोलंकी (Rivaba Solanki) म्हणाली की, धोनी नेहमीच संघाचा कर्णधार राहील आणि नेहमीच संघाचा थाला असेल. महत्त्वाचं म्हणजे, जडेजाला पहिल्यांदा कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे. यापूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कधीही नेतृत्व केले नाही.
रिवाबाने एमएस धोनी (MS Dhoni) आणि रवींद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) एक फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. यासोबतच चेन्नई सुपर किंग्स संघाचे थीम गाणेही लावले आहे. या पोस्टमार्फत तिने जडेजाला शुभेच्छा देत धोनीचे आभार मानले आहे.
आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाली रिवाबा
रिवाबाने पती जडेजाला शुभेच्छा दिल्या आणि धोनीचे आभार मानत लिहिले की, “तुझ्या यशाबद्दल अभिनंदन. तू खरंच याचा हक्कदार होता. तसेच, माही भाई तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. तुम्ही त्याच्या (जडेजा) क्षमतेवर विश्वास ठेवला आणि त्याला ही संधी दिली. तुम्ही नेहमीच त्याचे कर्धणार राहाल आणि संघाच्या मोठ्या भावाप्रमाणे राहाल.”
जडेजाला आधीच मिळाले होते संकेत
खरं तर धोनीने मागील वर्षीच जडेजाशी चर्चा केली होती आणि त्याला सांगितले होते की, त्याला अतिरिक्त जबाबदारी सांभाळावी लागू शकते. जडेजाने खुद्द संघाचे सीईओ विश्वनाथन यांच्याशी चर्चा करताना याचा खुलासा केला. तरीही, जडेजाने असे सांगितले की, कर्णधार बनवल्यानंतरही त्याच्यावर कोणताही दबाव नसेल. कारण, धोनी त्याच्यासोबत आहे.
कोलकाताविरुद्ध चेन्नईला पराभव जरी मिळाला असला, तरी एमएस धोनी आणि जडेजाने तुफान फटकेबाजी केली. धोनीने नाबाद ५० आणि जडेजाने २६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
चेन्नईचा पुढील सामना ३१ मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडिअम येथे लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
MI vs DC: दिल्लीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; मुंबईकडून ५ खेळाडूंचे पदार्पण
ती होती हजर अन् कॅमेरामनची पडली नजर! पहिल्याच आयपीएल सामन्यात चर्चेत आली ‘मिस्ट्री गर्ल