काही खेळाडू असे असतात, जे दुखापतीमुळे चालू सामन्यात एकदा बाहेर गेल्यावर परत येत नाहीत. मात्र, काही खेळाडू असेही असतात, जे कसलीही दुखापत असली, तरीही मैदानावर पुनरागमन करत विक्रम रचून जातात. या खेळाडूंमध्ये कर्णधार रोहित शर्मा याच्या नावाचाही समावेश होतो. रोहितने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापतग्रस्त होऊनही चाहत्यांची मने जिंकली. तसेच, त्याने इतिहासही रचला. रोहितने या वनडे सामन्यात नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 28 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी साकारली. यात 3 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. या षटकारांमुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकारांचा (500 sixes in international cricket) टप्पा पार केला. रोहित आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील दुसरा आणि भारतीय संघाचा पहिलाच फलंदाज बनला आहे. या यादीत अव्वलस्थानी वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल (Chris Gayle) याचा समावेश आहे. ख्रिस गेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकारांचा पाऊस पाडला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
553 षटकार- ख्रिस गेल
502 षटकार- रोहित शर्मा*
476 षटकार- शाहिद आफ्रिदी
398 षटकार- ब्रेंडन मॅक्युलम
383 षटकार- मार्टिन गप्टील
रोहितच्या नावावर कसोटीत 64 आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 182 षटकारांची नोंद आहे. तसेच, त्याने वनडेत 256 षटकार खेचले आहेत. या यादीत रोहितपाठोपाठ पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याचा समावेश आहे. त्याने एकूण 476 षटकार मारले आहेत. तसेच, चौथ्या स्थानी ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) असून त्याने 398 आणि पाचव्या स्थानी असलेल्या मार्टिन गप्टील (Martin Guptill) याने 383 षटकारांची बरसात केली आहे.
रोहितच्या वनडे कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने 238 डावांमध्ये 48च्या सरासरीने 9454 धावा केल्या आहेत. यामध्ये 29 अर्धशतके आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताच्या 7 विकेट्स पडल्यावर मैदानावर उतरला रोहित
भारतीय संघाने जेव्हा 7 विकेट्स गमावल्या, तेव्हा रोहित शर्मा याने मैदानावर पाऊल ठेवले. त्याला दुखापत झाली होती, परंतु तो भारताला विजयी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्याने भरपूर प्रयत्न केला. शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती. त्याने पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर सलग 2 चौकार मारले. त्यानंतर एक षटकारही मारला. मात्र, शेवटच्या चेंडूवर रोहितला षटकार मारता आला नाही, आणि भारताला पराभव पत्करावा लागला.
रोहित शर्मा दुखापतीमुळे तिसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर पडला आहे. याची माहिती स्वत: मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिली आहे. (captain rohit sharma becomes fastest batter to hit 500 sixes in international cricket second after chris gayle)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचं नशीबच खराब! मालिका तर गमावलीच, पण आता रोहितसह ‘हे’ तीन खेळाडूही होणार बाहेर
रोहितने जीवाची बाजी लावून संघासाठी काढल्या धावा; पण गावसकरांच्या अपेक्षा खूपच जास्त; म्हणाले…