भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022मध्ये शानदार कामगिरी करत आहे. भारताने पहिले दोनही सामने जिंकत विश्वचषकात विजयी सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला 4 विकेट्सने पराभूत केले. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँड्स संघाला 56 धावांनी पराभवाचं पाणी पाजलं. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने या दोन्ही सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी केली.
भारतीय संघाचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाचा फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) याने दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यापूर्वी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेकडे जर एन्रीच नॉर्किया आणि कागिसो रबाडा यांच्यासारखे वेगवान गोलंदाज आहेत, तर भारताकडे फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली (Virat Kohli) आहे. अक्षर पटेल पुढे बोलताना म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना महत्त्वपूर्ण असेल.
तो म्हणाला की, “आम्ही याबाबत योजना बनवू. आम्ही आमचा नैसर्गिक खेळ खेळू आणि उसळी घेणाऱ्या खेळपट्टीची चिंताही करणार नाही. महत्त्वाचं म्हणजे, त्यांच्याकडे एन्रीच नॉर्किया आणि कागिसो रबाडा यांसारखे गोलंदाज आहेत. आमच्याकडेही विराट कोहली आहे, जो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.”
अक्षर पटेल याने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 4 षटकांमध्ये 18 धावा देत 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. त्याने आपल्या गोलंदाजीबद्दल बोलताना म्हटले होते की, “गोलंदाजांसमोर फलंदाज संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो आणि यशस्वीही होतो. मी आमच्या गोलंदाजी प्रशिक्षकासोबत व्हिडिओ पाहिले, ज्यामध्ये दिसले की, लाईन आणि लेंथ चांगली आहे, पण एक चेंडू योग्य दिशेने जात नव्हता. जर तुम्ही चांगल्या चेंडूवर बाद झाला, तर पुन्हा त्याचबद्दल विचार करत राहता. तसेच, पुनरागमन करू शकत नाही.”
भारतीय संघाचा पुढील सामना
भारतीय संघाचा पुढील सामना 30 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. भारतासाठी हा महत्त्वपूर्ण सामना असल्याचे बोलले जात आहे. कारण, दक्षिण आफ्रिका संघाकडे जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत आणि ते विरोधी संघांना चिंतेत टाकू शकतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दोन तास हा इंग्रजीचं व्याकरण चेक करत होता’, झिम्बाब्वेची प्रशंसा करताच चाहत्यांकडून कामरान अकमल ट्रोल
क्रिकेटविश्वातील सर्वात क्रेझी आकडेवारी, ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये विराटच किंग!