भारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (दि. 20 नोव्हेंबर) खेळला गेेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंड संघाचा 65 धावांना पराभव केला. भारताच्या या विजयात सूर्यकुमार यादव याचे महत्वाचे योगदान होते. सूर्याने 51 चेंडूत 111 धावा करत भारताची धावसंख्या 191 पर्यंत पोहोचवली. त्याच्या याच खेळीवर न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज टीम साउदी याने महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची स्तुती करत टीम साउदी (Tim Southee) म्हणाला की,” जेव्हा एखादा खेळाडू टी20 सामन्यात शतक लगावतो, तेव्हा या शतकामुळे खूप मोठे अंतर निर्माण होते. तुम्ही भारतीय संघाची फलंदाजी बघा आणि ज्या पद्धतीने आम्ही फलंदाजी केली, त्या प्रकारची फलंदाजी सूर्याच्या खेळीपासून खूप लांब होती. सूर्याने भारताला अशा धावसंख्येेपर्यंत पोहचवले जी आमच्या अपेक्षेपेक्षा थोडी जास्त होती. ही खूप असामान्य खेळी होती. त्याच्या या खेळीने खूप अंतर वाढवले.”
या आव्हानाचा पाठलाग करण्याविषयी साउदी म्हणाला की, “या डावाचा शेवट याच प्रकारे होणार होता. याचे श्रेय भारतीय गोलंदाजीला जाते. धावफलकावर त्यांची चांगली धावसंख्या होती. जेव्हा तुम्ही नियमित अंतराने गडी बाद करण्यात आणि महत्वाचे म्हणजे सुरुवतीला गडी बाद करण्यात सक्षम असता, तेव्हा ते आव्हान आणखी मोठे होते. आमचा या सामन्यावरील ताबा सुटत होता. जेव्हा तुम्ही मोठ्या आव्हानाचा पाठलाग करता तेव्हा तुम्हाला कोणत्या तरी फळीत चांगल्या भागीदारीची गरज असते.”
सूर्यकुमार यादव याची स्तुती करत साऊदी म्हणाला की, ” तो असा खेळाडू जो मैदानाच्या बऱ्याच क्षेत्रात फटकेबाजी करु शकतो. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्याचे एक-दीड वर्ष शानदार राहिले आहे. त्याने या सामन्यात देखील आपल्या फलंदाजीने छाप टाकली.”
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 6 गडी गमावत 191 धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने शतक झळकावत 111 धावांची नाबाद खेळी केली. या आव्हानाला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेला संघ 126 धावा करत सर्वबाद झाला.(Tim Southee praised Suryakumar Yadav over his great performance)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमार बनू शकतो सर्वाधिक टी-20 धावा करणारा फलंदाज, पण करावी लागणार ख्रिस गेलासारखी खेळी
ऍलेक्स हेल्सने सांगितले टी20मध्ये यशस्वी होण्याची रहस्य, भारताचे खेळाडू करु शकतील का ‘या’ गोष्टी?