सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर तिसरा कसोटी सामना पार पडला. हा सामना अनिर्णित राखण्यात भारतीय संघाने यश मिळवले आहे. भारताला या सामन्यात शेवटच्या दिवशी विजयासाठी ३०९ धावांची गरज होती आणि हातात ८ विकेट्स होत्या. त्यानंतरही भारताने संपूर्ण दिवस खेळून काढत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवल्याने भारतीय संघाचे जोरदार कौतुक होत आहे. एवढेच नाही तर ‘द वॉल’ राहुल द्रविडला त्याच्या वाढदिवसाची सर्वात उत्तम भेट भारतीय संघाने दिल्याचंही बोलले जात आहे. खुद्द आयसीसीनेही याबाबत ट्विट केले आहे.
द्रविडचा वाढदिवस –
सोमवारी(११ जानेवारी) राहुल द्रविडचा ४८ वा वाढदिवस आहे. द्रविड नेहमीच त्यांच्या संयमी आणि चिवट फलंदाजीसाठी ओळखला जातो. काहीही झाले तरी बाद व्हायचे नाही, हा त्याचा दृष्टीकोन त्याने त्याच्या कारकिर्दीत बऱ्याचदा पाळला. त्यामुळे अनेकदा त्याने भारतासाठी सामने जिंकून दिले आहेत किंवा सामन्यातील पराभव टाळला आहे. त्याच्या याच गुणवत्तेमुळे त्याला ‘द वॉल’ असेही नाव पडले. कारण कितीही झालं तरी तो भारतीय संघासाठी प्रतिस्पर्धी गोलंदाजांसमोर भक्कम उभा राहायचा.
A fitting birthday gift for Rahul Dravid 🎁
An extraordinary display of resistance, fight and patience by India today 🙌#AUSvIND pic.twitter.com/5RLA5aqnQp
— ICC (@ICC) January 11, 2021
द्रविडप्रमाणेच सिडनी कसोटीत भारतीय संघाचा खेळ –
योगायोग म्हणजे नुकत्यात २०२१ या नवीन वर्षी सिडनीमध्ये पार पडलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने द्रविडप्रमाणेच टिच्चून फलंदाजी केली आहे. विशेष म्हणजे या सामन्यात भारताचे तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. रविंद्र जडेजाचा हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. तर रिषभ पंतच्या डाव्या हाताच्या कोपराला चेंडू लागला होता. तसेच हनुमा विहारीला हॅमस्ट्रिंगची दुखापत होती. तरीही जडेजा फलंदाजीची गरज लागली तर ती करण्यासाठी सज्ज झाला होता. तर पंतने ९७ धावांची तुफानी खेळी केली. एवढेच नव्हे, तर हॅमस्ट्रिंगचा त्रास होत असतानाही मैदानावर उपचार घेऊन विहारी खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने पॅव्हेलियनमध्ये परत न जाता लढावूवृत्ती दाखवली. त्याला साथ द्यायला आर अश्विन होता.
शेवटच्या दिवसाच्या अखेच्या सत्रात भारताला १२७ धावांची गरज होती. तर ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्स हव्या होत्या. त्यावेळी भारताला ३० पेक्षाही अधिक षटके खेळून काढायची होती. त्यातच विहारीला हॅमस्ट्रिंगचा त्रास व्हायला लागला. तरीही अश्विन आणि विहारीने चिवट खेळ केला आणि अखेर हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.
भारतीय संघासमोर या सामन्यात अनेक अडचणी होत्या. तरीही भारताने हार न मानता हा सामना अनिर्णित राखल्याने ही द्रविडसाठी एक सर्वोत्तम भेट असल्याचे म्हटले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाला चौथ्या डावात २०० धावाही करता येणार नाही म्हणणाऱ्या ‘त्या’ दिग्गजाला सणसणीत चपराक
वाढदिवस विशेष: राहुल द्रविड – भारतीय क्रिकेटचा ‘ध्रुव’ तारा
वाढदिवस विशेष: क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा राहुल द्रविड एकमेव क्रिकेटपटू