पुणे : पुण्याचा आघाडीचा मॅरेथॉन जलतरणपटू संपन्न शेलार याने पाल्कची सामुद्रधुनी ते धनुस्कोडी हे २९ किलोमीटरचे अंतर ५ तास ३० मिनिटांत पोहून पूर्ण केले आणि नवा विक्रम रचला. अशी कामगिरी करणारा तो पुण्याचा एकमेव, तर भारताचा वेगवान जलतरणपटू ठरला.
संपन्नने १६ मार्च रोजी सकाळी सहा वाजता श्रीलंकेतील तलाईमन्नार येथून पोहायला सुरुवात केली. यानंतर तो भारतातील धनुस्कोडी येथे सकाळी ११.३० वाजता पोहोचला. हे अंतर साडेपाच तासांत कापून त्याने २०१८मधील भारताच्या एम. तुलसी चैतन्यचा विक्रम मोडला. चैतन्यने हे अंतर ८ तास २५ मिनिटांत पूर्ण केले होते. यापूर्वी पाल्कची सामुद्रधुनी महाराष्ट्रातील केवळ दोघांनीच पोहून पार केली आहे, असे संपन्न यांनी सांगितले.
या मोहिमेत संपन्नला एंजल सेलर ओशन सर्व्हिसेसची मदत लाभली. तमिळनाडू क्रीडा प्राधिकरणाचे निरीक्षक राजेश समाथनम, मार्गदर्शक सुबोध सुळे, त्याचे प्रशिक्षक जितेंद्र खासनीस आणि मोठी बहीण निधी शेलार यांच्या देखरेखीखाली त्याने हा विक्रम रचला. त्याला भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि श्रीलंका नौदल यांचेही त्याला सहाय्य मिळाले. या विक्रमानंतर संपन्नला आता इंग्लिश खाडी पोहोण्याचे वेध लागले आहेत. कॅटलिना चॅनेलही पार करायचे आहे. त्याचबरोबर सात समुद्र अर्थात, सेव्हन ओशन चॅलेंज पूर्ण करण्याचे त्याचे ध्येय आहे.
याआधी संपन्नने बांगला खाडी दुहेरी रीत्या पूर्ण केली आहे. बांगला चॅनल दोन्ही मार्गाने पोहणारा संपन्न हा जगातील एकमेव पुरुष जलतरणपटू आहे. खुल्या पाण्यातील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने अनेक वेळा बाजी मारली आहे. मुंबई-गोवा-मुंबई पोहणाऱ्या रिले संघातही त्याचा समावेश होता. संपन्न याने सुचेता देवबर्मन, माजी नगरसेवक अविनाश जाधव, महाराष्ट्र जलतरण असोसिएशनच्या नीता तळवलीकर यांचे आभार मानले.
संपन्नचे वडील रमेश शेलार हे पीएमसीचे अधिकारी असून, आई शारदा शेलार या उद्योजिका आहेत. या दोघांचा त्याला पाठिंबा मिळाला. संपन्नची बहीण निधी शेलार ही देखील ओपन वॉटरमधील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आहे. संपन्न 22 वर्षांचा असून तो टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून फिजिओथेरपीची पदवी घेत आहे. तो स्वारगेट येथील शार्क अक्वेटिक क्लबमध्ये जितेंद्र खासनिस आणि हर्षद इनामदार यांच्याकडे सराव करतो. संपन्न याने त्याचे प्रायोजक सुजनील केमो इंडस्ट्रीजचे आशिष देसाई आणि पुणे ई स्टॉक ब्रोकिंगचे व्रजेश शाह यांच्याप्रती आभार व्यक्त केले.
(A record performance of swimmer Amunsha Shelar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेवटी कळलंच! विराट कोहली वापरतो ‘या’ कंपनीचा मोबाईल, किंमत लाखोंच्या घरात
भारताच्या पावरफुल पोरी! जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नीतू आणि स्वीटीचा गोल्डन पंच