न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या संघ निवडीबाबत अनेक चर्चा होताना दिसत आहे. भारतीय संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघातील पाच सलामीवीरांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
रोहित शर्मा कर्णधार असलेल्या या संघातील इतक्या सलामीवीरांना केवळ तीन सामन्यांत संधी मिळू शकत नाही, असे आकाशचे मत आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या. यासोबतच त्याने हार्दिक पंड्याला संघातून वगळल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
आकाश चोप्राच्या मते, पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक पंड्या चांगली खेळी करू शकला नव्हता. अशा स्थितीत त्याला संघातून वगळायला नको होते. त्याच्या यूट्यूब चॅनलवर तो म्हणाला, ‘विराट कोहली, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देणे हा योग्य निर्णय आहे, पण हार्दिक पंड्याचे काय? हार्दिकला खरोखर विश्रांतीची गरज आहे की त्याला संघातून वगळण्यात आले आहे? तो कसोटी क्रिकेट खेळत नाही याशिवाय त्याने आयपीएलमध्येही गोलंदाजी केलेली नाही. टी-२० विश्वचषकातील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तो काहीही करू शकला नाही.’
आकाश चोप्रा म्हणाला, ‘न्यूझीलंडविरुद्ध जाहीर केलेल्या भारतीय संघात अनेक सलामीवीर आहेत. ही एक चूक झाली आहे. टी२० क्रिकेटमध्ये आपण उपलब्ध स्लॉटसाठी खेळाडू निवडले पाहिजेत. आयपीएलच्या कामगिरीच्या आधारे निवड करणे ठीक आहे, पण जर तुम्ही म्हणाल की सर्वोत्तम सलामीवीर फलंदाज पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आला, तर तो त्या क्रमांकावर इतकी चांगली कामगिरी करू शकणार नाही.’
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, ‘भारताने तीन सामन्यांच्या मालिकेसाठी पाच सलामीवीरांची निवड केली आहे. केएल राहुल आणि रोहित शर्मा नक्कीच खेळतील. याशिवाय मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड, अवेश खान आणि हर्षल पटेल यांची निवड पूर्णपणे ठीक आहे. व्यंकटेश अय्यरचा संघात समावेश करण्यात आला आहे, तो फक्त सात सामने खेळला आहे, पण भारतीय संघाकडे आधीच चार इतर सलामीवीर आहेत. सहा महिन्यांपूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान चेतन साकारियाने चमकदार खेळी खेळली होती. अचानक तो संघाबाहेर फेकला गेला आहे. अशा प्रकारची अनियंत्रितता मला गोंधळात टाकत आहे.’
न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात रोहित शर्मा, केएल राहुल व्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, ईशान किशन या सलामीवीरांची निवड झाली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल और मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या –
आनंद गगनात मावेना! भारतीय संघात निवड होताच विमानतळावरून आवेश खान थेट प्रशिकाच्या घरी, कारण…
भारत-न्यूझीलंड पहिला टी२० सामना स्टेडियममधून पाहाता येणार, पण ‘या’ दोन अटी कराव्या लागणार पूर्ण






