भारतीय संघाचा उत्कृष्ट फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) याने मागच्या काही महिन्यांमध्ये अप्रतिम प्रदर्शन करून दाखवले आहे, परंतु यादरम्यान त्याला भारतीय संघासाठी खेळण्याच्या खूपच कमी संधी मिळाल्या. भारताचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा (aakash chopra) यांनी चहलविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी (IPL 2022) चहलवर मेगा लिलावात मोठी बोली लागू शकते.
आकाश चोप्रांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओत आकाश चहलविषयी बोलत आहेत. त्यांच्या मते भारतीय संघात त्याला महत्व मिळत नाहीये. ते म्हणाले की, ” मला समजत नाहीये की, अखेर त्याने काय चूक केली आहे. तो टी२० विश्वचषकात संघाचा भाग नव्हता. मात्र, त्यानंतर संघाचा भाग होता. त्याला संधी मिळाली नाही आणि शेवटी फक्त एका सामन्यात त्याला खेळायला मिळाले.”
आकाश चोप्रांनी पुढे बोलताना चहलवर आयपीएलच्या मेगा लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता व्यक्त केली. “चहलला तेवढा सन्मान मिळत नाहीय. ज्या दर्जाचा तो गोलंदाज आहे, ते पाहता त्याला चांगल्या प्रकारे वागणूक मिळाली पाहिजे. आरसीबीने त्याला आयपीएलमध्ये रिटेन केले नाही. जर तो ड्राफ्टच्या माध्यमातून कोणत्या संघात गेला नाही तर, त्यावर खूप मोठी बोली लागू शकते,” असे आकाश पुढे बोलताना म्हणाले.
चहलची आयपीएलमधील कारकीर्द पाहिली तर, तो आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग राहिला आहे. आरसीबी संघासाठी त्याने आतापर्यंत अनेकदा महत्वपूर्ण प्रदर्शन केले आहे. आयपीएलमध्ये त्याने आरसीबी संघासाठी १३९ विकेट्स घेतल्या आहेत. परंतु त्याने संघासाठी चांगले प्रदर्शन केले असले तरी, आरसीबीने पुढच्या हंगामापूर्वी त्याला रिलीज केले. आता तो मेगा लिलावात उपलब्ध असणार आहे. तत्पूर्वी त्याने टी२० विश्वचषकाच्या आधी पार पडलेल्या आयपीएलमध्ये देखील चांगला खेळ दाखवला होता. मात्र, तरीही टी२० विश्वचषकात त्याला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नव्हती.
महत्वाच्या बातम्या –
अश्विन पुन्हा दिसणार सीएसकेच्या रंगात? मेगा लिलावापूर्वी म्हणाला…
पीवायसी-पुसाळकर पीवायसी प्रीमियर क्रिकेट लीग 2021 स्पर्धेत टस्कर्स, जॅगवॉर्स संघांचा सलग तिसरा विजय