इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघामध्ये पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने बाजी मारत २ गडी राखून विजय मिळवला आहे. तसेच या सामन्यात बेंगलोरकडून एबी डिविलियर्सने ४८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीसोबतच त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांअखेर १५९ धावा केल्या आणि बेंगलोरला १६० धावांचे आव्हान दिले. या १६० धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातून विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिविलियर्स यांनी तुफान फटकेबाजी करत हा अटीतटीचा सामना २ गडी राखून बेंगलोरला जिंकून दिला.
तसेच एबी डिविलियर्स याने २७ चेंडूत सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने ४ चौकार आणि २ लांबच लांब षटकार लगावले. या षटकारांसह त्याने आयपीएल सामन्यांत शेवटच्या ४ षटकांमध्ये १०० षटकार लगावण्याचा विक्रम केला आहे. असा कारनामा करणारा तो आयपीएल स्पर्धेतील तिसरा फलंदाज ठरला आहे.
या यादीत पहिल्या स्थानी एमएस धोनी आहे. धोनीने आतापर्यंत एकूण १४१ षटकार सामन्याच्या शेवटच्या ४ षटकांत लगावले आहेत. तर दुसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज किरॉन पोलार्ड आहे. पोलार्डने आतापर्यंत सामन्यांच्या शेवटच्या ४ षटकांत १११ षटकार लगावले आहेत.
मुंबई इंडियन्स संघाने दिले १६० धावांचे लक्ष्य
मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर १५९ धावा केल्या होत्या. या डावात मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्मा याने १९ तर ख्रिस लिन याने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादव याने ३१ धावा केल्या. यासोबतच ईशान किशन याने २८ धावा केल्या तर हार्दिक पंड्या याला अवघ्या ७ धावा करता आल्या.
शेवटच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने जिंकला सामना
मुंबईने बेंगलोर संघासमोर १६० धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीने ३३ धावांची खेळी केली. तर वॉशिग्टंन सुंदर अवघ्या १० धावा करत माघारी परतला होता. तसेच ग्लेन मॅक्सवेल याने आक्रमक फलंदाजी करत ३९ धावांची खेळी केली होती. यासोबतच एबी डीविलियर्स याने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली होती.
शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर १ धावांची गरज असताना हर्षल पटेलने १ धाव पूर्ण करत सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला जिंकवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
बाबो! तब्बल १०७९ दिवसांनी मॅक्सवेलने मारला आयपीएलमध्ये षटकार, तोही चक्क १०० मीटरचा, पाहा व्हिडिओ






