बुधवारचा (दि. 19 जुलै) दिवस भारत ए संघासाठी खास ठरला. एसीसी पुरुष इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ संघात खेळला गेला. कोलंबो येथे पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताच्या विजयात दोन शिलेदारांनी मोलाचा वाटा उचलला. ते म्हणजेच वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर आणि सलामीवीर साई सुदर्शन होय. सुदर्शनने नाबाद शतक ठोकले, तर राजवर्धन याने पाकिस्तानच्या फलंदाजांची पळता भुई थोडी करून सर्वाधिक विकेट्स घेतल्या.
या सामन्यात पाकिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारत अ संघाच्या गोलंदाजांनी सपशेल चुकीचा ठरवला. पाकिस्तान पहिल्या डावात 10 विकेट्स गमावत 48 षटकात फक्त 205 धावाच करू शकला. पाकिस्तानकडून यावेळी एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. कासिम अक्रम या फलंदाजाने 48 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानच्या 10 विकेट्सपैकी 5 विकेट्स या फक्त राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) यानेच चटकावल्या होत्या.
राजवर्धनच्या 5 विकेट्स
गोलंदाजी करताना राजवर्धन शानदार लयीत दिसला. त्याने संघासाठी 8 षटके गोलंदाजी केली. यावेळी त्याने 42 धावा खर्च केल्या. तसेच, 5 फलंदाजांना तंबूत पाठवले. त्यामुळे त्याचे विकेट्सचे पंचकही पूर्ण झाले. हंगरगेकर याने यावेळी सईम अयूब, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, मोहम्मद वसीम आणि शाहनवाज दहानी यांना तंबूत पाठवले. हंगरगेकरव्यतिरिक्त मानव सुथारने 3, तर रियान पराग आणि निशांत सिंधू यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.
आयपीएलमध्ये सीएसके संघाचा भाग होता हंगरगेकर
राजवर्धन हंगरगेकर आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा भाग होता. मात्र, एमएस धोनी (MS Dhoni) याने त्याला फक्त 2 सामन्यातच खेळण्याची संधी दिली होती. या अष्टपैलू खेळाडूने आयपीएल 2023मध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, इमर्जिंग आशिया चषकात हंगरगेकरने भारतीय संघासाठी शानदार प्रदर्शन केले. त्याने यादरम्यान एकाच षटकात पाकिस्तानला दोन धक्के देत भारताला शानदार सुरुवात करून दिली होती.
भारताचा डाव
पाकिस्तानच्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 2 विकेट्स गमावत 36.4 षटकात 210 धावा केल्या. तसेच, सामना 8 विकेट्सने जिंकला. यावेळी भारताकडून सलामीवीर साई सुदर्शन (Sai Sudarsan) याने शतक झळकावले. त्याने 110 चेंडूंचा सामना करत नाबाद 103 धावा केल्या. यामध्ये 3 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त निकिन जोस यानेही 53 धावा करत अर्धशतक साकारले. तसेच, कर्णधार यश धुल (21) आणि अभिषेक शर्मा (20) यांनीही विजयात मोलाचे योगदान दिले. (acc mens emerging cup pacer rajvardhan hangargekar got 5 wickets pakistan all out for 205 runs read more)
महत्त्वाच्या बातम्या-
‘माझा तर जन्मही झाला नव्हता…’, विंडीजविरुद्धच्या 100व्या कसोटीपूर्वी असे का म्हणाला कॅप्टन रोहित?
मँनचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी ब्रॉडने रचला इतिहास, दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या 8 विकेट्स