ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेतल्यावर सामन्यात वर्चस्व गाजवण्याची संधी भारताकडे होती, मात्र दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद झाली. या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघावर टीकेची झोड उठली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज एॅडम गिलख्रिस्टने देखील भारताच्या पराभवामागचे कारण विशद केले.
पुजारा आणि कोहलीचे अपयश भोवले
माध्यमांशी बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला, “पहिल्या डावात पृथ्वी शाॅ स्वस्तात माघारी परतल्याने भारतीय संघ बॅकफूटवर गेला होता. त्यावेळी पुजारा आणि कोहलीने संयमी फलंदाजी करण्याचा मार्ग निवडला, जो माझ्यामते अगदी योग्य होता. त्यावेळी भारतीय संघ धावा काढण्यासाठी उतावीळ असल्याचे चित्र अजिबात नव्हते. पुजारा आणि कोहलीने केलेल्या भागीदारीमुळे भारताला योग्य दिशा मिळाली आणि अजिंक्य रहाणेच्या खेळीमुळे भारत २४४ धावांपर्यंत पोहोचू शकला. मात्र पुजारा आणि कोहलीला पहिल्या डावाची पुनरावृत्ती दुसऱ्या डावात न करता आल्याने भारतीय संघाचे अधिक नुकसान झाले.”
भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शाॅबद्दल देखील गिलख्रिस्टने आपले मत मांडले. पृथ्वी शाॅ दोन्ही डावात सपशेल अपयशी ठरला. त्यावर बोलताना गिलख्रिस्ट म्हणाला, “पृथ्वी मागील दौऱ्यातही भारतीय संघाचा भाग होता. तो दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नाही, मात्र त्याच्याबद्दल चर्चा होत असल्याने गोलंदाजांनी त्याच्याविरुद्ध रणनीती आखली आहे. दोन्ही डावात तो एकाच पद्धतीने बाद झाल्याने गोलंदाजांनी त्याच्या तंत्रातील दोषाचा अभ्यास केल्याचे स्पष्ट झाले. अशाप्रकारे आपल्या खेळातील उणीवा उघड होणे युवा सलामीवीर पृथ्वी शाॅसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे.”
एॅडम गिलख्रिस्टने व्यक्त केलेल्या मतातून देखील कर्णधार विराट कोहलीचे भारताच्या फलंदाजी फळीतील महत्व अधोरेखित होत आहे. मात्र पालकत्व रजेमुळे कोहली मायदेशात परतत असल्याकारणाने उर्वरित मालिकेत भारतीय संघ त्याच्याशिवाय पुनरागमन करू शकेल का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
संबधित बातम्या:
– म्हणून विदेशात पंतला द्यावी प्रथम पसंती; माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांचे मत
– बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडिया उतरणार नव्या जोशात; जडेजा, राहुल, गिलची संघात होणार एन्ट्री?
– IND vs AUS : बॉक्सिंग डे कसोटीच्या मॅन ऑफ द मॅचला मिळणार खास मुलाग मेडल; जाणून घ्या मेडलची विशेषता