---Advertisement---

चहलला मागे टाकत झंपा ‘ऑन टॉप’; दोन बळींसह केला मोठा कारनामा

---Advertisement---

युएई येथे खेळल्या जात असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी (२८ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ समोरासमोर आले. या एकतर्फी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा दणदणीत पराभव करत सलग दुसरा विजय साजरा केला. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघ अ गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला‌. केवळ १४ धावा देऊन दोन बळी घेणाऱ्या ऍडम झंपा याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. झंपाने या सामन्यात आपल्या शानदार गोलंदाजीने एक नवा विक्रम आपल्या नावे केला.

झंपाची जबरदस्त कामगिरी
फिरकीला अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर ऍडम झंपा याने दिमाखदार कामगिरी केली. त्याने आपल्या चार षटकांत फक्त १४ धावा देत चरिथ असलंका व आविष्का फर्नांडो या श्रीलंकेच्या दोन महत्त्वपूर्ण फलंदाजांना बाद केले.

या सामन्यात दोन बळी घेताच झंपा टी२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला. त्याच्या नावावर आता १६ बळी जमा झाले आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर भारताचा युजवेंद्र चहल व इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन हे आहेत. या दोघांच्या नावे प्रत्येकी १५ बळी असून, पाकिस्तानचा सईद अजमल आणि शाहिद आफ्रिदी दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहीर व वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्रावो यांच्या नावे प्रत्येकी १४ बळी जमा आहेत.

ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेसाठी कुसल परेरा व चरिथ असलंका यांनी प्रत्येकी ३५ धावांच्या खेळ्या केल्या. भानुका राजपक्षे याने अखेरपर्यंत नाबाद राहत ३३ धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स व ऍडम झंपा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियासाठी डेव्हिड वॉर्नर व ऍरॉन फिंच यांनी ७ षटकात ७० धावांची तुफानी सलामी दिली. कर्णधार फिंचने ३७ आणि वॉर्नरने ६५ धावांची खेळी केली. स्टीव्ह स्मिथ व मार्कस स्टॉयनिस यांनी अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला सात गडी राखून विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई करणार हार्दिकला रिलीज? श्रेयस सोडणार दिल्लीची साथ?

आनंदाची बातमी! दिनेश कार्तिक-दीपिका पल्लिकल झाले जुळ्या मुलांचे आई-बाबा, चिमुकल्यांची नावंही ठरली

कमाल राहुल आणि हिटमॅन रोहितच्या खांद्यावरच न्यूझीलंडविरुद्धची जबाबदारी; वाचा ही आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---