दुबई। गुरुवारी (४ नोव्हेंबर) टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सुपर १२ फेरीत बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात ऍडम झम्पाने ५ विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने काही मोठ्या विक्रमांकाना गवसणी घेतली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय ऍडम झम्पाने अगदी योग्य ठरवत ४ षटकांत १९ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे बांगलादेश संघ १५ षटकांत ७३ धावांवरच सर्वबाद झाला. दरम्यान, झम्पाने हे ५ विकेट्स घेताना ४ विक्रम केले आहेत.
झम्पा हा टी२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिलाच लेग स्पिनर ठरला आहे, ज्याने एका डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत. आत्तापर्यंत ४ फिरकीपटूंनी टी२० विश्वचषकात एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे, पण लेगब्रेक गोलंदाजी शैली असणारा झम्पा पहिलाच फिरकीपटू आहे.
याशिवाय टी२० विश्वचषकात एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा झम्पा ऑस्ट्रेलियाचा दुसराच गोलंदाज आहे. त्याच्यापूर्वी जेम्स फॉकनरने अशी कामगिरी केली आहे. त्याने मोहाली येथे २०१६ सालच्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या होत्या.
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाकडून टी२० क्रिकेटमध्ये एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा झम्पा तिसरा गोलंदाज आहे. यापूर्वी फॉकनर आणि ऍश्टन एगारने असा कारनामा केला आहे. एगारने २ वेळा ऑस्ट्रेलियाकडून टी२० क्रिकेटमध्ये एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने २०२० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि २०२१ साली न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.
इतकेच नाही तर, ऍडम झम्पाचे आता २०२१ च्या टी२० विश्वचषकात १० विकेट्स झाले आहेत. त्यामुळे एका टी२० विश्वचषकात १० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा झम्पा ऑस्ट्रेलियाचा दुसराच फिरकीपटू आहे. यापूर्वी २०१० साली स्टिव्ह स्मिथने असा कारनामा केला होता. त्याने २०१० सालच्या टी२० विश्वचषकात ११ विकेट्स घेतल्या होत्या.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशने दिलेले ७४ धावांचे ऑव्हान ऑस्ट्रेलियाने ६.२ षटकांतच २ विकेट्स गमावत पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
विंडीजला पछाडत श्रीलंकेची विजयी सांगता; हेटमायरची एकाकी झुंज अपयशी