धरमशाला। आज(18 मार्च) अफगाणिस्तान संघाने आयर्लंड विरुद्ध राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळला आहे. हा अफगाणिस्तानचा कसोटी क्रिकेटमधील पहिलाच विजय असल्याने त्यांच्यासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला आहे.
अफगाणिस्तानचा हा दुसराच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता. त्यामुळे पहिला कसोटी विजय मिळवण्यासाठी सर्वात कमी सामने खेळण्याच्या यादीतही आफगाणिस्तानने इंग्लंड आणि पाकिस्तानची बरोबरी केली आहे. इंग्लंड आणि पाकिस्तानलाही पहिला कसोटी विजय जिंकण्यासाठी प्रत्येकी 2 सामने खेळावे लागले होते.
अफगाणिस्तानने पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध खेळला होता. पण त्यांना त्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.
https://twitter.com/AdityaGund/status/1107549417278599168
धरमशाला येथे आयर्लंड विरुद्ध झालेल्या या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा फलंदाज रेहमत शहाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने या सामन्यात पहिल्या डावात 98 आणि दुसऱ्या डावात 76 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.
आयर्लंडने या सामन्यात विजयासाठी अफगाणिस्तानसमोर 147 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य अफगाणिस्तानने चौथ्या दिवशी 3 विकेट्स गमावत सहज पूर्ण केले. अफगाणिस्तानच्या दुसऱ्या डावात शहाबरोबरच इशानुल्लाह जनतनेही 65 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 144 धावांची शतकी भागिदारी करत अफगाणिस्तानच्या विजयाचा पाया रचला होता.
तत्पूर्वी या सामन्यात आयर्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 172 धावा केल्या होत्या. याला प्रतिउत्तर देताना अफगाणिस्थानने पहिल्या डावात सर्वबाद 314 धावा करत 142 धावांची भक्कम आघाडी मिळवली.
दुसऱ्या डावात आयर्लंडने चांगली फलंदाजी करताना अँड्र्यू बाल्बर्नी(82) आणि केविन ओब्रायन(56) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद 288 धावा करत अफगाणिस्तानला 147 धावांचे आव्हान दिले.
या सामन्यात अफगाणिस्तानच्या रशिद खानने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तसेच अफगाणिस्तानच्या अन्य गोलंदाजांपैकी यामीन अहमदझाईने 6, वकार सलामखीलने 4 आणि मोहम्मद नबीने 3 विकेट्स घेतल्या.
तर आयर्लंडकडून स्टुअर्ट थॉमसन ,अँडी मॅकब्राइन आणि जेम्स कॅमेरॉन डाऊने प्रत्येकी 3, जॉर्ज डॉकरेलने 2 आणि टिम मुर्तघने 1 विकेट घेतली.
https://twitter.com/ICC/status/1107540632791384066
महत्त्वाच्या बातम्या-
–डेव्हिड वाॅर्नरची धमाकेदार सुरुवात, क्रिकेटमध्ये केली जबरदस्त वापसी
–पृथ्वी शाॅचा मोठा खुलासा, कोहली-शास्त्री असे वागले ड्रेसिंगरुममध्ये
–आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टाॅप ५ खेळाडू