आशिया चषक 2022चा उद्घाटन सामना अतिशय रोमांचक राहिला. शनिवारी (27 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेवर 8 विकेट्सने विजय मिळवला. अफगाणिस्तानला आशिया चषक मोहिमेची विजयी सुरुवात करून देण्यात त्यांच्या गोलंदाजांचा मोठा वाटा राहिला. अफगाणिस्तानने 19.4 षटकातच श्रीलंकेला 105 धावांवर रोखले आणि इथेच विजय निश्चित केला. अफगाणिस्तानच्या या विजयामागे पाकिस्तान कनेक्शनही आहे. ते कसे जाणून घेऊ…
अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका (AFGvsSL) सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 105 धावांवरच गुंडाळला गेला. या डावात अफगाणिस्तानकडून फझल फारुखीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. धारदार गोलंदाजी करत त्याने 3.4 षटकात केवळ 11 धावा देत 3 महत्त्वपूर्ण विकेट्स काढल्या. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच मुजीब उर रेहमान आणि स्वत: कर्णधार मोहम्मद नबीनेही चांगली गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या.
प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या 106 धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 10.1 षटकातच विजय मिळवला. अफगाणिस्तानकडून रहमनुल्लाह गुरबाजने सर्वाधिक 40 धावांचे योगदान दिले.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अफगाणिस्तानच्या विजयामागे पाकिस्तानचे काय कनेक्शन आहे? तर आशिया चषकासाठी (Asia Cup 2022) अफगाणिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक (Afghaistan Bowling Coach) हे पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज उमर गुल (Umar Gul) सध्या अफगाणिस्तानच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी कार्यरत आहे. त्यामुळे या विजयात उमर गुल यांचा देखील मोठा वाटा आहे. त्यांच्या इनपुट्सच्या जोरावरच अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे.
दरम्यान आशिया चषकातील ब गटातील हा पहिलाच सामना होता. ब गटात अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघाचा समावेश आहे. तर अ गटात भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँगचा समावेश आहे. या दोन्ही गटातील पहिले दोन संघ सुपर-4 फेरी खेळणार आहेत. अफगाणिस्तानने आपला पहिलाच सामना जिंकून ब गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.