भारतीय संघाचा विस्फोटक अष्टपैलू हार्दिक पंड्याने आयपीएल २०२२पूर्वी आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत किंवा इतर कोणत्याही क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली नव्हती. मात्र, आयपीएल २०२२मध्ये तो नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार बनला आहे. पहिल्यांदाच आपल्या नेतृत्वात तो खरा उतरला आहे. तो आपल्या नेतृत्वात गुजरात संघाला आयपीएलमध्ये यशाच्या पायऱ्या चढवत आहे. त्याने यंदाच्या हंगामात सर्वप्रथम आपल्या संघाला १८ गुणांसह प्लेऑफचे पहिले तिकीट मिळवून दिले आहे. प्रत्येक ठिकाणी त्याच्या नेतृत्वाची आणि मैदानावर घेतलेल्या निर्णयाची प्रशंसा केली जाते. अशातच त्याच्या संघाचा सहकारी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याचे गुणगान गायले आहेत.
मोहम्मद शमी (Mohammed Shami) याने स्वीकारले की, गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याच्यात अनेक बदल पाहिले आहेत. शुक्रवारी (दि. १३ मे) माध्यमांशी बोलताना शमी म्हणाला की, “कर्णधार म्हणून हार्दिक चांगले मार्गदर्शन करत आहे हे खूप महत्त्वाचे आहे. जणू तो कुटुंबाचा प्रमुख आहे. समजूतदार असणे आणि परिस्थिती समजून घेणे हे खूप महत्वाचे आहे, जे त्याने खूप चांगले हाताळले आहे. एका खेळाडूच्या तुलनेत कर्णधार म्हणून मी त्याच्यात बरेच बदल पाहिले आहेत.”
पुढे बोलताना शमी म्हणाला की, “पंड्या आपल्या कौशल्याच्या आधारावर आता एक कर्णधाराच्या रूपात वेगळी जागा बनवत आहे. पहिल्या दोन सामन्यात तो तडकाफडकी निर्णय घेऊ लागला होता. मात्र, आता हळूहळू १२ सामने पूर्ण झाल्यानंतर तो खूपच सामंजस्य आणि शांत झाला आहे. तसेच, पहिल्यांदा नेतृत्व करणे कोणासाठीही सोपे नसते. खूपच दबाव असतो. विशेषत: तेव्हा, जेव्हा तुम्ही एका मोठ्या स्पर्धेत नेतृत्व करत असता. यावेळी एक वेगळाच दबाव असतो. कर्णधाराला वरिष्ठ खेळाडू, प्रशिक्षक यांच्याकडून जास्त पाठिंब्याची आवश्यकता असते, जी आम्ही त्याला देत आहेत.”
“प्रत्येक कर्णधार वेगळ्या पद्धतीने वागतो आणि वेगळा विचार करतो. जसे की, माही भाई (एमएस धोनी) खूप शांत असायचा, विराट आक्रमक असायचा आणि रोहितचे वागणे सामन्याची परिस्थिती काय आहे यावर अवलंबून असते. हार्दिकही असाच आहे, नवीन काही नाही,” असेही पंड्याच्या स्वभावाबद्दल पुढे बोलताना शमी म्हणाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
शमीने असाही खुलासा केला की, त्याने गुजरातकडून खेळण्यास सुरुवात केल्यानंतर आधी पंड्याला आपल्या मैदानावरील प्रतिक्रियांना नियंत्रित करण्याचा सल्ला दिला होता. पंड्याच्या स्वभावाबद्दल सांगताना शमी म्हणाला की, “हे खूप चांगले आहे. तुम्ही त्याचा स्वभाव बघितला असेल की, तो थोडा आक्रमक होता, पण आता तो शांत झाला आहे, पण कर्णधारपद मिळाल्यापासून तो अगदी सामान्य पद्धतीने विचार करू लागला आहे आणि वागू लागला आहे.”
“मी त्याला मैदानावर सांगितले होते की, कृपा करून तुझ्या रागावर नियंत्रण ठेव. कारण, संपूर्ण जग सामना पाहत आहे,” असेही पंड्याबद्दल बोलताना शमी म्हणाला. शमीने भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराचे या संघाला मजबूत कुटुंब म्हणून एकत्र आणल्याबद्दल आणि त्याचे व्यवस्थापन केल्याबद्दल कौतुक केले.
गुणतालिकेत गुजरात संघ अव्वलस्थानी आहे. गुजरातने १२ सामने खेळताना ९ सामन्यात विजय, तर उर्वरित ३ सामन्यात पराभव पत्करला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बेअरस्टोने दाखवली आयपीएलमधील आपली ‘पॉवर’, पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा चोपण्यात बनला ‘टॉपर’
IPL 2022। चेन्नईचा काटा काढल्यानंतर तिलक वर्माने मैदानातच कुणासाठी जोडले हात? घ्या जाणून