भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१७ नोव्हेंबर) जयपूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात महत्वाची खेळी केली. त्याने हा सामना सुरू होण्यापूर्वी आगामी टी२० विश्वचषकाबबत एक खास प्रतिक्रिया दिली होती.
नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे प्रदर्शन निराशाजनक राहीले, त्यानंतर भारतीय संघ पुढच्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकात चांगले प्रदर्शन करू इच्छित आहे. न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मानेही नाणेफेक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना पुढच्या वर्षीच्या टी२० विश्वचषकावर संघाचे लक्ष असल्याचे सांगितले.
नाणेफेक जिंकल्यानंर रोहित शर्मा म्हणाला की, “आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू. खेळपट्टी चांगली वाटत आहे. विचार केला होता की, आम्ही एका लक्ष्याचा पाठलाग करावा. काही दिवासांच्या सरावात खूप धुके होते. हे चांगले होते, केवळ दोन दिवस झाले आहेत, एक त्वरित बदलाव आला आहे. दुबईमधून परत आल्यावर काही दिवस घरी घालवले आणि पुन्हा खेळायला आलो, पण हे संघासाठी चांगले असेल.”
आगामी टी२० विश्वचषकाविषयी रोहित शर्माने महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तो यावेळी म्हणाला की, “आमची एक नजर पुढच्या विश्वचषकावर आहे, यासाठी अजून वेळ आहे, पण आम्ही पर्यायांवर काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. काही परिणाम तत्काळ होऊ शकणार नाही, पण प्रक्रिया महत्वाची असेल.” पुढीलवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबदरम्यान टी२० विश्वचषक होणार आहे.
दरम्यान, भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे लक्ष्य ५ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.४ षटकात गाठले.
न्यूझीलंडसाठी सलामीवर मार्टिन गप्टिल (७०) आणि डॅरील मिशेल (६३) यांनी महत्वपूर्ण खेळी केली. तर दुसरीकडे भारतासाठी कर्णधार रोहित शर्मा (४८) आणि सूर्यकुमार यादव (६२) यांनी संघाच्या विजयात महत्वाचे योगदान दिले. त्याव्यतिरिक्त भारताच्या भुवनेश्वर कुमार आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्टने देखील दोन महत्वाचे विकेट्स घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
वुमेन्स बिग बॅश लीगमध्ये स्म्रीती मंधनाचा शतकी धमाका! ‘असा’ पराक्रम करणारी पहिलीच भारतीय
येत्या जानेवारी महिन्यात रंगणार १९ वर्षाखालील विश्वचषकाचा थरार; जाणून घ्या स्पर्धेबदल सर्व काही