भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचे मार्गदर्शन अनेक युवा खेळाडूंना आजपर्यंत मिळाले आहे. अनेकदा आयपीएल दरम्यान देखील धोनी युवा खेळाडूंशी चर्चा करताना दिसून येतो. त्यामुळे अनेकदा युवा खेळाडू देखील धोनीने केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आपला अनुभव सांगत असतात. नुकतेच अशाच धोनीबद्दलच्या आठवणी महाराष्ट्राचा खेळाडू राहुल त्रिपाठी याने (Rahul Tripathi) सांगितल्या आहेत.
त्रिपाठी धोनीसह आणि धोनी विरुद्ध आयपीएलमध्ये सामने खेळले आहेत. त्याने २०१७ साली रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्या संघात धोनीदेखील होता, तर स्टीव्ह स्मिथ पुण्याच्या संघाचे नेतृत्त्व करत होता. हा संघ आयपीएलमध्ये २०१६ आणि २०१७ असे दोनच वर्षे सहभागी होता.
त्यानंतर धोनीने २०१८ मध्ये बंदी पुर्ण झाल्यानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केलेल्या चेन्नईच्या नेतृत्त्वाची धूरा हाती घेतली, तर त्रिपाठी २०१८ आणि २०१९ या दोन हंगामासाठी राजस्थान रॉयल्स आणि २०२० आणि २०२१ हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळला. आता आयपीएल २०२२ साठी त्रिपाठीला सनरायझर्स हैदराबादने खरेदी केले आहे.
न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत त्रिपाठीने धोनीबद्दलच्या आठवणींना उजाळाला दिला. तो म्हणाला, ‘मला अजूनही आठवते माझे आयपीएल पदार्पण करत होतो, तेव्हा तो मला म्हणाला होता की, नेटमध्ये जसा खेळतो, तसाच खेळ. तो प्रत्येक युवा खेळाडूशी लहान भावासारखा वागतो. त्याने मला २०१७ मध्ये संपूर्ण स्पर्धेत मार्गदर्शन केले.’
याबरोबरच त्रिपाठीने हे देखील स्पष्ट केले की, कधीकधी धोनी त्याला ओरडला देखील आहे. त्याने सांगितले की, ‘कधीकधी तो मला चांगली कामगिरी करण्यासाठी ओरडला देखील आहे. ‘अजून करत…हे कर’, अशाप्रकारे तो मला सांगायचा. जेव्हा मी राजस्थान आणि केकेआर संघांकडून खेळत होतो, तेव्हा मी वेळ मिळेल, तेव्हा त्याचा सल्ला घ्यायचो. तो मला काय चाललं आहे, असंही विचारायचा’
याबरोबर त्रिपाठी गेल्यावर्षी कोलकाताकडून चेन्नईविरुद्ध आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळला. त्यावेळी तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे खालच्या फळीत फलंदाजीसाठी आला होता. त्या सामन्याची आठवण सांगताना त्रिपाठी म्हणाला, ‘मी धावा करू शकत नव्हतो, मी खरंच एकेरी, दुहेरी धावा घेण्यासाठी संघर्ष करत होतो. मी जेव्हा बाद झालो, तेव्हा माही भाईने माझ्या पाठीवर थाप मारली आणि मला म्हणाला, ‘काही नाही, आज तुझा दिवस नव्हता. पण तू १०० टक्के प्रयत्न केला.’ आम्ही अंतिम सामना पराभूत झाल्यानंतर मला खूप निराश वाटत होते, पण माही भाई सामन्यानंतर आला आणि माझ्याशी काही मिनिट चर्चा केली.’
आयपीएल २०२२ साठी झालेल्या लिलावात त्रिपाठीसाठी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने देखील बोली लावल्या होत्या. पण सनरायझर्स हैदराबादने त्याच्यासाठी सर्वाधिक ८.५० कोटी रुपयांची बोली लावली आणि त्याला आपल्या संघात सामील करून घेतले.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसरी टी२०: नाणेफेक जिंकून पोलार्डचा गोलंदाजीचा निर्णय, वेस्ट इंडिज संघात खतरनाक अष्टपैलूचे पुनरागमन
टीम इंडियासोबत वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्डही करणार शतक? कसं ते घ्या जाणून