भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघ हा आयपीएलच्या प्रत्येक हंगामात उत्तम कामगिरी करतो. सीएसकेने 3 वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. यंदाच्या हंगामात या संघाने पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केले. परंतु त्यानंतर या संघाला दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध सलग दोन पराभवाला सामोरे जावे लागले.
या दोन्ही सामन्यात कर्णधार एमएस धोनी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करायला आला होता. धोनी फलंदाजीसाठी आला जेव्हा सामना जिंकणे खूप अवघड झाले होते. खूप कमी चेंडू शिल्लक होते आणि प्रत्येक षटकात जवळपास 15 च्या धावगतीने धावा फटकावण्याची गरज होती. त्यामुळे धोनीने तळातील फलंदाजी क्रमांकावर फलंदाजीला येण्याबद्दल अनेकांनी टिका केली. धोनीच्या फलंदाजीच्या क्रमाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अजय जडेजानेही आपले मत व्यक्त केले आहे.
पुढाकार घेऊन जिंकली जाते लढाई
जडेजा म्हणाला, “धोनी खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. असे करून सामना जिंकू शकत नाही. प्रत्येक लढाई पुढाकार घेऊन जिंकली जाते. तो वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल तर संघ सामना नक्कीच जिंकू शकतो. जर संघात चांगले फलंदाज असतील तर तो खालच्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो पण संघात सध्या अनुभवी फलंदाज नाही.”
पुढे बोलतांना तो म्हणाला “धोनी जेव्हा भारताकडून खेळायचा तेव्हा त्याच्याकडे कर्णधार म्हणून पाहिले जायचे, परंतु चेन्नई संघात त्याला चांगली फलंदाजीही करावी लागेल; कारण चेन्नईच्या चाहत्यांना त्याने ठोकलेले चौकार षटकार पाहायचे आहे. आता समजा मी माझ्या मुलास सांगितले आहे की प्रत्येकाने परिस्थितीनुसार धोनीप्रमाणे क्रिकेट खेळायला हवे आणि जर त्याने हे शेवटचे दोन सामने पाहिले असतील तर त्याला हे पटणार नाही.”
सीएसके संघात होईल बदल
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या पराभवानंर धोनीने सांगितले की, “संघात रणनीती आणि फलंदाजीचा क्रम बदलण्याची गरज आहे.”
सीएसकेला आता पुढील सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 2 ऑक्टोबरला खेळायचा आहे. धोनी संघात काय बदल करतो हे पाहावं लागेल.