मुंबईत सुरू असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील दुसऱ्या कसोटी सामना सध्या यजमान संघाच्या बाजूने वळताना दिसतो आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत भारतीय संघाने ५३९ धावांची आघाची घेतली असून न्यूझीलंडला विजयासाठी ५४० धावांचे आव्हान मिळाले आहे. या सामन्यात सरासरी खेळ दाखवणाऱ्या न्यूझीलंडकडून फिरकी गोलंदाज एजाज पटेल याने मात्र विलक्षण असे प्रदर्शन केले आहे. संपूर्ण सामन्यात १४ विकेट्स घेत त्याने बरेचसे विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.
भारताच्या पहिल्या डावात डावखुरा गोलंदाज एजाजने इतिहास घडवला. भारतीय संघाची संपूर्ण फलंदाजी फळी उद्ध्वस्त करत तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात १० विकेट्स घेणारा केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी एजाजने भारताचे ४ फलंदाज बाद केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या दुसऱ्याच षटकात त्याने सलग २ विकेट्स घेत दिवसाची सुरुवात केली. आपली हाच भेदक मारा सुरू ठेवत त्याने पुढे भारताच्या उरलेल्या चारही विकेट्स काढल्या. अशाप्रकारे आपल्या ४७.५ षटकांच्या स्पेलमध्ये ११९ धावा देताना त्याने १० विकेट्स घेतल्या.
त्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावातही सलामीवीर मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि जयंत यादव यांना त्याने पव्हेलियनचा रस्ता दाखवला. २६ षटके गोलंदाजी करताना १०६ धावा देत त्याने ही कामगिरी केली.
एजाज पटेलने केले हे विक्रम
अशाप्रकारे दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने एकूण २२५ धावांवर १४ विकेट्स मिळवल्या आहेत. यासह तो कोणत्या कसोटी सामन्यात सर्वोत्त्कृष्ट गोलंदाजी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने न्यूझीलंडचे दिग्गज गोलंदाज डॅनियल व्हिटोरी यांना मागे सोडले आहे. व्हिटोरी यांनी २००० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२/१४९ अशी गोलंदाजी कामगिरी केली होती. तर या यादीत १५/१२३ अशा कामगिरीसह अव्वलस्थानी रिचर्ड हेडली विराजमान आहेत.
याबरोबरच एजाजची ही गोलंदाजी आकडेवारी भारताविरुद्धची कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरीही ठरली आहे. याबाबतीत त्याने इंग्लंडच्या आयन बॉथम यांना मागे टाकले आहे. यापूर्वी १९८० मध्ये भारताविरुद्ध बॉथम हे १०६ धावांवर १३ विकेट्स घेत भारताविरुद्ध कसोटीत सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी करणारे पहिलेच गोलंदाज ठरले होते. इतकेच नव्हे तर, एजाजने आपल्या या गोलंदाजी आकडेवारीसह, वानखेडेच्या स्टेडियमवरील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी कामगिरीच्या पराक्रमातही बॉथम यांना पछाडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रसेलच्या वादळात उडाली दिल्ली; डेक्कन ग्लॅडिएटर्स नवे टी१० ‘चॅम्पियन’