ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या अजिंक्य रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेत कर्णधार विराट कोहली परत आल्याने पुन्हा आपली उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळण्यास कसलीही हरकत नाही. कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर पालकत्त्व रजेमुळे तो भारतात परतला होता. त्यामुळेच रहाणे ऑस्ट्रेलियात कर्णधाराच्या भूमिकेत होता असे त्याचे म्हणणे आहे.
उजव्या हाताचा फलंदाज कोहली आता इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. खेळाच्या वेळी कर्णधाराच्या डोक्यात अनेक गोष्टी असतात. कोहली जेव्हा- जेव्हा मला विचारेल, तेव्हा- तेव्हा आपण त्याला सल्ला देण्यास तयार असल्याचेही रहाणेनी सांगितले आहे.
काय म्हणाला अजिंक्य रहाणे ?
रहाणेने बुधवारी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, “विराट कोहली हा भारताचा कर्णधार आहे. कौटुंबिक कारणास्तव तो ऑस्ट्रेलियामधून माघारी परतला होता, म्हणूनच मी कर्णधार झालो. मुळात विराट भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि मी उपकर्णधार आहे. त्यामुळे तो आमच्याबरोबर परत आला याबद्दल मला खरोखरच आनंद आहे.”
विराटचे पुनरागमन ही बाब भारतीय संघासाठी खरोखरच सकारात्मक असल्याचे देखील रहाणेने सांगितले. तो म्हणाला, “एक संघ म्हणून आम्ही एकत्र काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. माझे काम हे मागे राहून विराटला मदत करणे हे आहे. मी उपकर्णधार असताना सहसा बॅकसिट घेतो. आपल्या परिस्थितीची योग्य कल्पना घेऊन खेळात काय घडू शकतात? यावर कर्णधाराने तुम्हाला सूचना विचारल्यावर तुम्ही तयार असायला हवे.”
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या इंग्लंड मालिकेसाठी आपल्या खेळावर खरोखरच खूप मेहनत घेत असल्याचे देखील रहाणेने स्पष्ट केले. “हार्दिक पंड्या आपला खेळ, फलंदाजी आणि गोलंदाजी या तिन्हीवर कठोर परिश्रम घेत आहे. तसेच अक्षर पटेलच्या पदार्पणाबद्दल संपूर्ण प्रशिक्षणानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ,” असे मत त्याने व्यक्त केले.
“आम्हाला चांगल्या ब्रँडचे क्रिकेट खेळायचे असून आम्ही त्याला हलक्यात घेऊ शकत नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात अजून तीन ते चार महिने आहेत. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. न्यूझीलंडने खूप चांगली खेळी खेळली असून अंतिम फेरी गाठण्यास ते पात्र ठरले आहेत. त्यामुळे अंतिम फेरी आमच्या संघाला कशी गाठता येईल? यावर आम्ही लक्ष करू,” असे रहाणेने शेवटी सांगितले.
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी, तीन वनडे आणि पाच टी२० सामने होणार आहेत. कसोटी मालिकेचे पाहिले दोन सामने चेन्नईत होणार असून पाहिला सामना शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत का इंग्लंड, चेन्नई कसोटीत कोणाचे पारडे जड? ‘अशी’ आहे आकडेवारी
स्मिथ, वॉर्नरसह इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ‘या’ अटीवर मिळणार आयपीएल २०२१ मध्ये एन्ट्री