भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना कालपासून (२४ फेब्रुवारी) अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघाचे गोलंदाज या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत. पहिल्या डावात भारताच्या प्रभावी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा डाव ११२ धावांवर संपुष्टात आला. या प्रत्युतरात भारताचा डावही अवघ्या १४५ धावांवर गुंडाळला गेला.
पण भारताला पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही हाराकिरी पत्करली. नवव्या षटकातच त्यांचे तीन गडी बाद झाले होते. भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने हे तीनही बळी पटकावले. त्याने डावाच्या पहिल्या षटकातच दोन्ही सलामीवीरांना धाडले होते. त्यानंतर डावाच्या नवव्या षटकात त्याने एका अप्रतिम चेंडूवर डॉमिनिक सिबलीला झेलबाद केले.
पंतने घेतला अप्रतिम झेल
नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अक्षर पटेलने सिबलीला उजव्या यष्टीबाहेर फ्लाईट दिलेला एक चेंडू टाकला. या चेंडूवर सिबलीने स्विप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त वळला. त्यामुळे चेंडूने त्याच्या बॅटची कडा घेतली. हा चेंडू वेगाने स्लिपकडून जात होता. मात्र यष्टीरक्षक रिषभ पंतने प्रसंगावधान दाखवून झेल टिपला.
पंचांनी सिबलीला लगेच बाद दिले होते. मात्र त्याने कर्णधार जो रूटशी चर्चा करून डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र तिसऱ्या पंचांनी पाहिलेल्या रिप्लेमध्ये चेंडूने बॅटची कडा घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे डॉमिनिक सिबली ७ धावा काढून तंबूत परतला आणि अक्षर पटेलने दुसऱ्या डावातील तिसरा तर सामन्यातील एकूण नववा बळी टिपला.
पाहा व्हिडिओ-
https://twitter.com/overtheropes29/status/1364903551097397250
दरम्यान, कमी धावसंखेचा ठरत असलेल्या या सामन्यात पहिल्या डावात कमी धावसंख्येवर सर्वबाद होऊनही भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. पहिल्या डावातील ३३ धावांची आघाडी घेतल्यानंतर त्यांनी दुसऱ्या डावात इंग्लंडला ८१ धावांवर गुंडाळले आहे. अक्षर पटेलने पुन्हा एकदा दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. त्याला आर अश्विनने चार बळी घेत सुयोग्य साथ दिली. त्यामुळे भारताला शेवटच्या डावात ४९ धावांचे छोटेखानी लक्ष्य मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
आर अश्विन @४००! आर्चरला बाद करताच झाला या दिग्गजाच्या यादीत सामील
INDvENG 3rd Test Live: अक्षरने केला रुटचा अडथळा दूर; २० ओव्हरच्या आत इंग्लंडचा अर्धा संघ तंबुत
द्विशतक एक विक्रम अनेक! पृथ्वी शॉने ऐतिहासिक खेळी करत मिळवले दिग्गजाच्या यादीत स्थान