भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमध्ये २१ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२१ दरम्यान कसोटी, एकदिवसीय आणि टी २० मालिका खेळल्या जाणार आहेत. या दरम्यान दोन्ही संघ तीन एकदिवसीय, एक कसोटी आणि तीन टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळतील. कसोटी सामना गुलाबी चेंडूने म्हणजेच दिवस-रात्र स्वरुपातील खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाची दिग्गज क्रिकेटपटू एलिसा हिलीही या मालिकेत खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिका सुरु होण्यापूर्वी तिने सलामीवीर म्हणून रोहित शर्माकडून प्रेरणा घेत असल्याचे सांगितले.
एलिसाने कबूल केले की, वनडे आणि टी -२० मालिकेदरम्यान कसोटीची तयारी करणे एक आव्हान असेल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यात हेलीने मधल्या फळीत फलंदाजी केली होती. जेव्हा तिने २०१९ दरम्यान शेवटची कसोटी खेळली, तेव्हा तिने संघासाठी सलामी दिली होती. त्यात तिने कारकिर्दीतील पहिले कसोटी अर्धशतक झळकावले होते.
कसोटीत सलामी देण्याबाबत हेली म्हणाली, ‘हे एक अवघड काम आहे, कारण मी फक्त चार कसोटी खेळली आहे. त्यामुळे मी कसोटीबद्दल मी खूप निश्चिंत आहे, असे म्हणणार नाही. मला वाटते की स्वतःला अधिक वेळ देण्याची क्षमता विकसित करणे अधिक आनंददायी असेल. ‘
एलिसा पुढे म्हणाली, ‘मी आधुनिक कसोटी क्रिकेट बघते, तेव्हा कळते की यात किती बदल झाला आहे. मला बरेच पुरुष क्रिकेटपटू दिसतात. पण मी रोहित शर्मासारख्या क्रिकेटपटूकडे पाहते. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित जगातील सर्वात आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी सलामीवीर देखील आहे. म्हणूनच मला त्याच्याकडून खूप प्रेरणा मिळते, त्याच्यासारख्या क्रिकेटपटूवर माझे लक्ष असते. क्रिकेटच्या सर्व प्रकारानुसार रोहित आपले कौशल्य बदलतो. मी नेहमी विचार करते की मला त्याच्यासारखी कौशल्य आत्मसात करता येतील का?’
एलिसा हिली ही ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचा दिग्गज गोलंदाज मिशेल स्टार्कची पत्नी आहे. एलिसाने केवळ ४ कसोटी सामने खेळले आहेत. तसेच ७९ एकदिवसीय सामने आणि ११८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. तिने कसोटीत २०१ धावा केल्या असून सर्वोच्च धावसंख्या ५८ धावा आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये हिलीने १९२७ धावा केल्या आहेत. यात तिने ३ शतके आणि १२ अर्धशतके केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये २१२१ धावा केल्या असून १ शतक आणि १२ अर्धशतके तिच्या नावावर आहेत. तिची एकदिवसीय सामन्यात १३३ धावा आहे, तर आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये नाबाद १४८ धावा अशी आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सर्व चौकटी मोडून जगात क्रिकेट समालोचनाचा आदर्श घालून देणारी नेरोली मिडोज
तब्बल १२२ वनडे खेळून एकही शतक, एकही सामनावीर पुरस्कार न मिळालेला क्रिकेटर पुढे झाला वकिल
महान क्रिकेटरला आहे विश्वास; म्हणाले, ‘कोहली एकदा लयीत येऊद्या मग शतक नव्हे त्रिशतक ठोकेल’