जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२१) उर्वरित हंगामाला सुरुवात होण्यास दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने मे महिन्यात आयपीएल अर्ध्यातून स्थगित करण्यात आलेली. त्यानंतर आता चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधीनंतर परदेशात दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळला जाईल.
आयपीएलच्या या उत्तरार्धात अनेक नवे विक्रम रचले जाण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असलेला लसिथ मलिंगा निवृत्त झाल्याने एका भारतीय गोलंदाजाला या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर जाण्याची संधी असेल.
या भारतीय दिग्गजाला अव्वल जाण्याची संधी
आयपीएल इतिहासात सर्वाधिक बळी घेण्याची कामगिरी श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज व आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. त्याने २००८ ते २०१९ या कालावधीत १२२ सामने खेळताना १७० गडी बाद केले होते. मात्र, मलिंगा मागील वर्षी पासुन आयपीएलमध्ये सहभागी होत नाही.
मलिंगाच्या अनुपस्थित आयपीएल इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचा मान भारताचा वरिष्ठ लेगस्पिनर अमित मिश्रा याला मिळू शकतो. मिश्राने २००८ पासून आयपीएलमध्ये सहभागी होताना १६६ बळी आपल्या नावे केले आहेत. १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या आयपीएल च्या उत्तरार्धात तो आणखी पाच बळी घेऊन मलिंगाला मागे टाकू शकतो. मिश्रा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.
अव्वल दहामध्ये फिरकीपटूंचा बोलबाला
आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांत फिरकीपटूंचा बोलबाला आहे. मलिंगा आणि मिश्रा यांच्या पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर भारताच्या पियुष चावला याचा क्रमांक लागतो. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १५६ बळी टिपले आहेत. वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणारा ड्वेन ब्रावो याच्या नावे देखील तितकेच बळी आहेत. त्यानंतर हरभजन सिंग, रविचंद्रन अश्विन, सुनील नरीन व युजवेंद्र चहल यांचा क्रमांक लागतो.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी नव्हे विराटच भारताचा सर्वोत्तम टी२० कर्णधार! पाहा आकडेवारी
कॅप्टन म्हणूनही ‘किंग’! टी२० क्रिकेटमध्ये ‘या’ बाबतीत विराट जगातील भल्याभल्या कर्णधारांना पडलाय भारी
‘तर धोनी महान क्षेत्ररक्षकही झाला असता’, कैफने शेअर केलेला जुना व्हिडीओ