भारतीय संघाचा फिरकीपटू अमित मिश्रा बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने भारताकडून २०१७मध्ये बंगळुरू येथे इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळला होता. त्यानंतर त्याने एकही सामना खेळलेला नाही. याबद्दल त्याने आता आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
तो म्हणाला, “मला आजपर्यंत समजले नाही की मी संघातून बाहेर का आहे. मी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तरीही मला संघात स्थान दिलेले नाही.” त्याने पुढे सांगितले की, त्याला न सांगता संघातून वगळण्यात आले होते. मी त्यावेळी कर्णधार विराट कोहलीशी (Virat Kohli) मदत मागितली होती. परंतु मदत मिळाली नाही.
‘स्पोर्ट्स तक’ला दिलेल्या मुलाखतीत मिश्रा (Amit Mishra) म्हणाला की, “न्यूझीलंडचा संघ भारतात आला होता. त्यावेळी मी मालिकावीर होतो. अंतिम सामन्यात मी सामनावीर होतो. यानंतर इंग्लंडचा संघ आला तर मला वनडेत घेतले नाही. त्यानंतर टी२०मध्ये पहिला आणि दुसरा सामना मला खेळता आला नाही. तिसऱ्या सामन्यात मी खेळलो होतो. त्याच सामन्यात मला दुखापत झाली होती. त्यावेळी मी चांगली गोलंदाजी केली होती.”
“तसेच मी २-३ विकेट्सही घेतले होते. त्यावेळी अनिल कुंबळे (Anil Kumble) प्रशिक्षक होते. ते मला म्हणाले होते की, तू जा आणि फीट होऊन ये. मी गेलो परंतु दुखापत खूप वाढली होती आणि ठीक होत नव्हती,” असेही मिश्रा यावेळी म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, “मी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) ७-८ महिने होतो. जेव्हा मी फीट होऊ लागलो तर एक-दोन निवडकर्त्यांशी चर्चाही केली. परंतु कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर अचानक फिजिओचा फोन आला की मला सामन्यासाठी फीट व्हायचे आहे. मी ३ देशांतर्गत सामन्यांमध्ये २०-२२ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर पुन्हा जखमी झालो आणि पुनरागमन करताना वनडे आणि टी२० सामन्यांमध्ये खेळलो. तसेच आयपीएलमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली.”
“आयपीएलनंतर (IPL) माझ्याशी कोणीही कसलीच चर्चा केली नाही. कोणीही आतापर्यंत मला विचारले नाही की तू कसा आहेस फीटनेस कशी आहे. त्यावेळी विराट कर्णधार बनला होता. मी आयपीएलनंतर त्याच्याशी चर्चाही केली. विराट म्हणाला की, निवडकर्त्यांना विचारून सांगतो. त्यानंतर आतापर्यंत कोणीही चर्चा केली नाही,” असेही मिश्रा पुढे म्हणाला.
“कोणीही माझ्यातील कमतरता मला सांगितल्या नाहीत. आताही मी चांगला खेळतो. माझ्याबरोबर दुखापतग्रस्त होणाऱ्या वृद्धिमान साहाचे (Wriddhiman Saha) पुनरागमन झाले आहे. परंतु माझे नाही. संघाचा नियम आहे की, जो दुखापतग्रस्त होऊन संघाबाहेर जाईल तो सर्वप्रथम संघामध्ये येईल. परंतु असे काही झाले नाही,” असेही दुखापतीबद्दल बोलताना मिश्रा म्हणाला.
मिश्राने भारताकडून २२ कसोटी सामने, ४० वनडे सामने आणि १० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ७६, वनडेत ६४ आणि टी२०त १६ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेडिंग घडामोडी-
-ड्रेसिंग रुममध्ये मला मारणार होते रिचर्ड्स, पाय पकडून मागितली माफी
-कोहलीला सतत तंबूचा रस्ता दाखवणारे जगातील ५ गोलंदाज
-माझ्यावरील बॅनचा स्विकार करतो, परंतु सट्टेबाजांची नावं सांगणार नाही