जगातील सर्वात मोठी आणि सर्वांची आवडती टी२० क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) होय. २००८पासून सुरू झालेल्या आयपीएलचा यंदाचा १५वा हंगाम सुरू आहे. अशात असे वृत्त समोर येत आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला आयपीएलमधून खूप चांगली कमाई होणार आहे. येत्या २०२३ ते २०२७ दरम्यान आयपीएलच्या ५ हंगामांसाठीच्या हक्कांचा लिलाव होणार आहे. यामधून बीसीसीआय तब्बल ७.२ बिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास ५४ हजार कोटी रुपयांची कमाई करू शकते. (Apple, Amazon, Disney Keen On Buying IPL Media Rights For 2023- 27 Period)
सध्या निविदा कागदपत्रांची विक्री होत आहे. आतापर्यंत टीव्ही १८ वायकॉम, डिज्नी, सोनी, झी, अमेझॉन आणि आणखी एका कंपनीने कागदपत्र खरेदी केले आहेत. अशी चर्चा आहे की, अमेरिकन कंपनी ऍपलदेखील (Apple) लवकरच निविदा कागदपत्र खरेदी करू शकते.
मीडिया हक्कांच्या लिलावाबद्दल या ५ मुद्द्यांमधून घ्या जाणून-
१. येत्या १० मेपर्यंत खरेदी केले जाऊ शकतात कागदपत्र
मीडिया हक्कांचे निविदा कागदपत्र १० मेपर्यंत खरेदी केले जाऊ शकतात. यानंतर जवळपास एक महिन्यापर्यंत जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी होईल आणि जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लिलाव जिंकून हक्क मिळवणाऱ्या कंपनीच्या नावाची घोषणा केली जाईल.
२. चार वेगवेगळ्या बकेटचा होणार लिलाव
बीसीसीआय (BCCI) यावेळी मीडिया हक्कांसाठी चार वेगवेगळ्या बकेटचा लिलाव करत आहे. पहिला बकेट हा भारतीय उपखंडात टीव्ही हक्कांचा आहे. दुसरा बकेट हा डिजिटल हक्कांसाठी आहे. तिसऱ्या बकेटमध्ये १८ सामन्यांचा समावेश आहे. या १८ सामन्यांमध्ये हंगामातील पहिला सामना, आठवड्याच्या शेवटी होणारे डबल हेडरमधील सायंकाळचा सामना आणि ४ प्ले-ऑफ सामन्यांचा समावेश आहे. चौथ्या बकेटमध्ये भारतीय उपखंडाच्या बाहेरच्या प्रसारणाच्या हक्कांचा समावेश आहे.
३. मूळ किंमत आहे ३२,८९० कोटी रुपये
बीसीसीआयने सर्व चार बकेट मिळून एकूण ३२,८९० कोटी रुपयांची मूळ किंमत तयार केली आहे. प्रत्येक सामन्याच्या टीव्ही हक्कांची मूळ किंमत ही ४९ कोटी रुपये ठरवलीये. दुसरीकडे, एका सामन्याच्या डिजिटल हक्कांची मूळ किंमत ३३ कोटी रुपये ठेवलीये. १८ सामन्यांतील प्रत्येक सामन्याची मूळ किंमत ही १६ कोटी रुपये आहे. भारतीय उपखंडाच्या बाहेरील हक्कांसाठी प्रत्येक सामन्याची मूळ किंमत ३ कोटी रुपये आहे. अशाप्रकारे एकूण रक्कम ही ३२,८९० कोटी रुपये होते. बीसीसीआयला अपेक्षा आहे की, त्यांना जवळपास ५४ कोटी रुपये मिळू शकतात.
४. दोन दिवसात होईल हक्कांचा लिलाव
बीसीसीआयने सांगितले आहे की, पहिल्या आणि दुसऱ्या बकेटचा लिलाव एकाच दिवशी होईल. दुसरीकडे, तिसऱ्या आणि चौथ्या बकेटचा लिलाव त्याच्या दुसऱ्या दिवशी केला जाईल. ही प्रक्रिया ई-ऑक्शनमार्फत पूर्ण होईल. पहिल्या बकेटच्या विजेत्या कंपनीला दुसऱ्या बकेटसाठी पुन्हा बोली लावण्याची परवानगी असेल. म्हणजेच, जर दुसरा बकेट इतर कोणत्या कंपनीने खरेदी केला आहे, तर पहिला बकेट खरेदी करणारी कंपनी त्याहून अधिक रक्कम देऊन ते मिळवू शकते. अशाप्रकारे दुसऱ्या बकेटच्या विजयी कंपनीला तिसऱ्या बकेटसाठी पुन्हा एकदा बोली लावण्याची परवानगी असेल.
५. भारतीय उपखंडाचे टीव्ही हक्क भारतीय कंपन्यांनाच मिळतील
बीसीसीआयने असेही सांगितले की, भारतीय उपखंडातील फक्त अशी कंपनी टीव्ही हक्कांसाठी बोली लावू शकते, जी भारतात नोंदणीकृत प्रसारक आहे आणि तिची संपत्ती १ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या बकेटसाठी बोली लावणाऱ्या कंपनीची संपत्ती कमीत कमी ५०० कोटी रुपये असणे आवश्यक आहे.
आयपीएलचा १५वा हंगाम यंदा भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात पार पडत आहे. हंगामातील ७० साखळी सामने एकूण १० संघांमध्ये खेळले जाणार आहेत. तसेच, हंगामाचा अंतिम सामना हा २९ मे रोजी खेळला जाणार आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video : आधी विराट मग सिराज नंतर सगळेच, वानखेडेवर RCBचे भिडू लागले नाचू
IPL 2022| केव्हा आणि कसा पाहाल कोलकाता वि. मुंबई सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
…म्हणून दिलीप वेंगसरकरांना म्हटलं जातं ‘लॉर्ड ऑफ लॉर्ड्स’; गावसकर-सचिनलाही तोडता आला नाही विक्रम