ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये एंट्री केली आहे. शनिवारी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्रानं पंजाबचा 70 धावांनी पराभव केला. 50 षटकांच्या सामन्यात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 275 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, पंजाबचा संघ 44.4 षटकांत 205 धावांवर ऑलआऊट झाला.
महाराष्ट्रासाठी युवा फलंदाज अर्शीन कुलकर्णीनं शानदार कामगिरी केली. त्यानं लिस्ट ए क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावलं. 19 वर्षीय अर्शिननं पंजाबविरुद्ध 137 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीनं 107 धावा केल्या. याशिवाय त्यानं गोलंदाजीत कमाल दाखवत 4 षटकांत फक्त 7 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली. अर्शिननं अंकित बावनेसोबत तिसऱ्या विकेटसाठी 145 धावांची भागिदारी केली. अंकितनं 85 चेंडूत 60 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 7 चौकार मारले.
अखेरच्या षटकांमध्ये यष्टीरक्षक निखिल नाईकनं स्फोटक फलंदाजी केली. त्यानं अवघ्या 29 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं नाबाद 52 धावा ठोकल्या. सत्यजित बचाव 15 चेंडूत 20 धावा करून नाबाद राहिला. पंजाबकडून अर्शदीप सिंग सर्वात प्रभावी गोलंदाज होता. त्यानं 9 षटकांत 56 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. अभिषेक शर्मानं 10 षटकांत 42 धावा देऊन एक विकेट घेतली.
276 धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघ 44.4 षटकांत 205 धावा करून ऑलआऊट झाला. पंजाबकडून एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. अर्शदीप सिंगनं सर्वाधिक 49 धावा केल्या. अनमोलप्रीत सिंगनं 48 धावांचं योगदान दिलं. बाकी फलंदाज 25 धावांचा आकडाही गाठू शकले नाहीत. महाराष्ट्राकडून मुकेश चौधरीनं शानदार गोलंदाजी केली. त्यानं 8 षटकांत 44 धावा देत 3 विकेट घेतल्या. प्रदीप दधेनं 31 धावा देऊन 2 बळी घेतले.
हेही वाचा –
कोहलीचा ‘विराट’ विक्रम धोक्यात! यशस्वी जयस्वाल लवकरच करणार मोठा पराक्रम
“हा खेळाडू सचिन तेंडुलकरपेक्षाही चांगला”, ग्रेग चॅपेल यांनी केली धक्कादायक तुलना
विजय हजारे ट्रॉफीमध्ये भारतीय गोलंदाजाचा धुमाकूळ! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळेल का?