भारतीय कसोटी संघ येत्या २ जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या संपूर्ण इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी (७ मे) २० जणांचा भारतीय संघ जाहीर केला आहे. तसेच ४ राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे.
राखीव खेळाडूंमध्ये आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, अभिमन्यू ईश्वरन आणि अर्झन नागवासवाला यांचा समावेश आहे. त्यामुळे जर २० जणांच्या संघातील कोणत्या खेळाडूंला कोणत्याही कारणाने खेळता आले नाही, तर राखीव खेळाडूंमधील खेळाडूंना या दौऱ्यात खेळण्याची संधी मिळू शकते. दरम्यान, भारताच्या या एकूण २४ जणांच्या खेळाडूंच्या ताफ्यात अर्झनचा समावेश झाल्याने एका विक्रमाची नोंद झाली आहे.
अर्झन हा पारसी समाजातील क्रिकेटपटू आहे. त्यामुळे तब्बल ४६ वर्षांनंतर भारतीय संघात निवड होणारा तो पहिला पारसी खेळाडू ठरला आहे. यापूर्वी फारुख इंजिनियर हे शेवटचे भारतीय पुरुष संघाकडून खेळलेले पारसी खेळाडू होते. त्यांनी १९७५ साली भारताकडून कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
तसेच डायना एडुल्जी या भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळलेल्या शेवटच्या पारसी खेळाडू होत्या. त्यांनी १९९३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर आता अर्झन हा पारसी खेळाडू भारतीय संघात खेळू शकतो.
कोण आहे अर्झन नागवासवाला?
२३ वर्षीय अर्झन हा डावखुरा मध्यमगती गोलंदाज असून त्याचा जन्म सुरत, गुजरात येथे झाला. त्याने गुजरातच्या वरिष्ठ संघात २०१८ साली अ दर्जाच्या सामन्यातून पदार्पण केले. त्याने राजस्थानविरुद्ध हा पदार्पणाचा सामना खेळताना ८ षटकात ३४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याचवर्षी त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही पदार्पण झाले. पण त्याला बडोदा विरुद्धच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात खास काही करता आले नाही. त्याने केवळ १ विकेट घेतली.
तसेच अर्झनसाठी २०१९-२० हंगाम खुपच चांगला ठरला. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये या हंगामात ८ सामन्यांत ४१ विकेट्स घेतल्या होत्या. या दरम्यान त्याने एका डावात ५ विकेट्स घेण्याची कामगिरी ३ वेळा केली. तसेच १ वेळा सामन्यात १० विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
याबरोबरच यावर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. त्याने सय्यद मुश्ताक अली २०२१ स्पर्धेत ९ विकेट्स आणि विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत १९ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉपीमध्ये महाराष्ट्र विरुद्ध १९ धावांच ६ विकेट्स घेतल्या होत्या.
अशी आहे अर्झनची एकूण कारकिर्द –
अर्झनने आत्तापर्यंत १६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने २२.५३ सरासरीने ६२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने २० अ दर्जाने सामने खेळले असून २१.७६ च्या सरासरीने ३९ विकेट्स घेतल्या आहेत. तर १५ टी२० क्रिकेट सामन्यांत १६.३८ च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईसाठी आनंदाची बातमी! फलंदाजी प्रशिक्षक हसी कोरोना निगेटिव्ह, लवकरच होऊ शकतो ‘या’ देशात रवाना
दिल्लीत कोरोनाचा तांडव, भीतीपोटी विलियम्सनसह ‘या’ किवी खेळाडूंनी वेळेपूर्वीच घेतला भारताचा निरोप