बर्मिंगहॅम। आज(5 ऑगस्ट) पहिल्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी इंग्लंडवर 251 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या ऍशेस मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात विजयासाठी 398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 146 धावांवर सर्वबाद झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने या सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी केल्या आहेत. त्यामुळे त्याला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
1 ऑगस्टपासून सुरु झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
पण पहिल्याच डावात 122 धावांवर 8 बाद अशी परिस्थिती असताना ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने एक बाजू भक्कमपण सांभाळताना 219 चेंडूत 144 धावा केल्या. तसेच पिटर सिडलने 44 धावांची खेळी करत स्मिथला चांगली साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद 284 धावा करता आल्या. इंग्लंडकडून या डावात स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 374 धावा केल्या आणि 90 धावांची आघाडी मिळवली. या डावात इंग्लंडकडून सलामीवीर फलंदाज रॉरी बर्न्सने 133 धावांची शतकी खेळी केली. तर कर्णधार जो रुटने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि नॅथन लायनने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
90 धावांची पिछाडीनंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चांगला खेळ केला. या डावातही स्मिथने 207 चेंडूत 142 धावांची खेळी केली. तसेच मॅथ्यू वेडने 110 धावांची शतकी खेळी केली. त्याचबरोबर ट्रेविस हेडने 51 धावांची तर जेम्स पॅटिन्सनने नाबाद 47 धावांची खेळी केली.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 7 बाद 487 धावा करत दुसरा डाव घोषित केला आणि 397 धावांची आघाडी घेत इंग्लंडला 398 धावांचे आव्हान दिले. या डावात इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
398 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडकडून दुसऱ्या डावात ख्रिस वोक्सने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली. तसेच जो रुट आणि जेसन रॉयने प्रत्येकी 28 धावा तसेच रॉरी बर्न्स आणि जो डेन्लीने प्रत्येकी 11 धावा केल्या.
मात्र अन्य फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. त्यामुळे इंग्लंडचा डाव 146 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून या डावात नॅथन लायनने सर्वाधिक 6 तर पॅट कमिन्सने 4 विकेट्स घेतल्या.
पहिल्या ऍशेस सामन्याचा संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – सर्वबाद 284 धावा
इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 374 धावा
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 7 बाद 487 धावा (घोषित)
इंग्लंड दुसरा डाव – सर्वबाद 146 धावा
(ऑस्ट्रेलियाचा 251 धावांनी विजय)
सामनावीर – स्टिव्ह स्मिथ (पहिला डाव- 144 धावा, दुसरा डाव – 142 धावा)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–कसोटीत स्टेन गन पुन्हा धडाडणार नाही; डेल स्टेनची कसोटीतून निवृत्ती
–सुरेश रैनाला मागे टाकत किंग कोहलीचा टी२० क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम
–शानदार अर्धशतकी खेळी करत रोहित शर्माचा टी२०मध्ये विश्वविक्रम; विराटला टाकले मागे