दुबई। आज(२३ सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात एशिया कप २०१८ मधील सुपर फोरचा सामना सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २३८धावांचे आव्हान ठेवले आहे.
पाकिस्तानकडून अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने अर्धशतक करत पाकिस्तानला२०० धावांचा टप्पा पार करुन देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचे सलामीवीर फलंदाज फकार जामन आणि इमाम उल हकने डावाची सुरुवातही चांगली केली होती. परंतू १० धावा केल्यानंतर इमामला फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने पायचीत बाद केले.
मात्र यावर पंचांनी नाबाद दिले होते,पण त्यानंतर भारताने रिव्ह्यू घेतला. या रिव्ह्यूमध्ये इमाम बाद असल्याचे दिसल्याने पंचांना आपला निर्णय बदलावा लागला.
यानंतरही बाबर आझम आणि फकारने सावध खेळ केला होता. पण १५ व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजी करत असताना फकार एक फटका मारताना घसरला आणि तो चेंडू त्याच्या पॅडला लागला, त्यामुळे त्याला पायचीद बाद देण्यात आले. परंतू नंतर दिसले की तो चेंडू त्याच्या ग्लव्हजला लागून गेला होता.
फकारच्या पाठोपाठ लगेचच फॉर्ममध्ये असलेला बाबर आझमही धावबाद झाला. त्याला या सामन्यात ९ धावाच करता आल्या.
या ३ विकेट झटपट गमावल्यानंतर मात्र चौथ्या क्रमांकावर बढती घेऊन खेळायला आलेला पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद आणि शोएब मलिकने डाव सावरताना १०७ धावांची शतकी भागीदारी रचली.
या जोडीने एक-दोन धावा काढत धावफलक हालता ठेवला होता. अखेर कुलदीपला ही जोडी तोडण्यात यश आले. त्याने सर्फराजला रोहित शर्माकडे झेल देण्यास भाग पाडले. सर्फराजने ६६ चेंडूत ४४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २ चौकार मारले.
सर्फराज बाद झाल्यानंतर असिफ अलीने फलंदाजीला येत छोटेखानी पण तुफानी खेळी केली. त्याने आणि मलिकने मिळून ४२ व्या षटकात २२ धावा काढल्या. यावेळी भुवनेश्वर कुमार गोलंदाजी करत होता.
मात्र त्यानंतर खेळपट्टीवर स्थिर असलेल्या मलिकला बाद करण्यात जसप्रीत बुमराहला यश आले. त्याने मलिकला यष्टीरक्षक धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले. मलिकने ९० चेंडूत ४चौकार आणि २ षटकारांसह ७८ धावांची अर्धशतकी खेळी केली.
याच्या पाठोपाठ असिफलाही चहलने बाद केले.असिफ २१ चेंडूत ३० धावा करुन बाद झाला.
यानंतर शादाब खान (१०) आणि मोहम्मद नवाजने(१५*) पाकिस्तानला ५० षटकात ७ बाद २३७ ही धावसंख्या गाठून दिली.
भारताकडून जसप्रीत बुमराह(२/२९) ,कुलदीप यादव(२/४१) आणि युजवेंद्र चहलने (२/४६) यांनी विकेट घेतल्या.
महत्वाच्या बातम्या-
–…आणि पाकिस्तानचे चाहते जोरदार भडकले
–पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर
–रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जगातील सर्वात विध्वंसक जोडी