जेव्हाही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना येतो, तेव्हा सामन्यापूर्वी दोन्ही देशाचे माजी खेळाडू मोठमोठ्या भविष्यवाणी करतात. यामध्ये आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याच्या नावाचाही समावेश झाला आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी शोएब अख्तरने मोठी भविष्यवाणी केली आहे. त्याने म्हटले, की जर पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तर भारतीय संघाची चांगली धुलाई होईल. अख्तरनुसार, ही खेळपट्टी अशी आहे, जिथे चेंडू बॅटवर चांगल्याप्रकारे येत आहे.
काय म्हणाला अख्तर?
शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याचा विश्वास आहे की, पल्लेकेले येथे जो संघ प्रथम फलंदाजी करेल, त्याला फायदा होईल. अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले, “जर पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, तर निश्चितच ते भारताविरुद्ध भरपूर धावा करतील. मात्र, भारताने नाणेफेक जिंकली, तर पाकिस्तान संघ अडचणीत सापडू शकतो. कारण, खेळपट्टी अद्याप सज्ज झाली नाहीये, पण उजेडात चेंडू बॅटवर योग्यप्रकारे येत नाहीये.”
‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून ओळखला जाणारा अख्तर भारतीय गोलंदाजांविषयी भाष्य करत पुढे म्हणाला, “मला वाटते, की भारताने तीन वेगवान गोलंदाजांसोबत उतरले पाहिजे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज खूप चांगले गोलंदाज आहेत. याव्यतिरिक्त कुलदीप यादवलाही खेळवले पाहिजे. कुलदीपला बाहेर बसवून आधीच त्याची प्रतिभा बर्बाद केली आहे. त्याला चांगली जाण आहे.”
स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्याचा भारताचा मानस
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या पल्लेकेले येथे सामना खेळला जाणार आहे. आशिया चषकातील हा भारताचा पहिलाच सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून भारत स्पर्धेतील सुरुवात शानदार करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यावर प्रत्येक क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे. मात्र, यावेळी पाकिस्तान संघाचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानने नेपाळ संघाला वाईट पद्धतीने पराभूत करत स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. त्यांचे सर्वच खेळाडू तुफान फॉर्ममध्ये दिसत आहेत. (asia cup 2023 former pak pacer shoaib akhtar big prediction on india vs pakistan clash)
हेही वाचाच-
बिग ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, बदलून टाकला कर्णधार; वाचा
‘ईशानने ओपन करावे तर, विराटने 4 नंबरवर फलंदाजी करावी’, भारतीय माजी खेळाडूचे वक्तव्य