आशिया चषक 2023 स्पर्धेला बुधवारपासून (दि. 30 ऑगस्ट) सुरू झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघात खेळला गेला. हा सामना पाकिस्तानने मोठ्या फरकाने जिंकला. पाकिस्तानने नेपाळला 238 धावांनी पराभवाचा धक्का देत स्पर्धेत विजयी सुरुवात केली. या सामन्यात पाकिस्तानने बाबर आझम याने शानदार शतकी खेळी साकारली. मात्र, क्रिकेटप्रेमींना सर्वाधिक उत्सुकता लागली आहे, ती म्हणजे, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची. या स्पर्धेत भारतीय संघातील 4 खेळाडू पहिल्यांदाच वनडेत पाकिस्तानविरुद्ध खेळताना दिसतील. चला तर, त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात…
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील सामना, ही जगभरातील अनेक क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणीच असते. मात्र, रंजक बाब अशी की, आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत भारताचे असे 4 खेळाडू आहेत, जे पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध वनडे सामना खेळणार आहेत. ते खेळाडू इतर कुणी नसून सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill), मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), यष्टीरक्षक फलंदाज ईसान किशन (Ishan Kishan) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) हे आहेत.
हे चारही खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होणे निश्चित आहे. तसं पाहिलं, तर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना जर प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली, तर तेदेखील पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळताना दिसतील.
तब्बल 4 वर्षांनंतर भिडतील भारत विरुद्ध पाकिस्तान
भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आशिया चषक 2023 स्पर्धेत 2 सप्टेंबर रोजी एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. तब्बल 4 वर्षांनंतर वनडेत हे दोन कट्टर संघ एकमेकांचा सामना करणार आहेत. यापूर्वी भारत-पाकिस्तान (India-Pakistan) 2019च्या वनडे विश्वचषकात अखेरचे भिडले होते. हा सामना भारताने जिंकला होता. मात्र, आता प्रत्येकाला आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुकता लागली आहे. खरं तर, या आशिया चषकात जर दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचले, तर 3 वेळा भारत-पाकिस्तान संघात सामना होऊ शकतो.
पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही राहुल
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आशिया चषकातील दोन सामने खेळू शकणार नाही. त्यामुळे 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध ईशान किशन भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग असण्याची शक्यता आहे. (asia cup 2023 ind vs pak first time this cricketers will play against pakistan team india playing 11)
हेही वाचाच-
भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते पथिरानाने अवघ्या 20व्या वयात करून दाखवलं, बांगलादेशविरुद्ध घडला मोठा विक्रम
ASIA CUP: पथिराना-थिक्षणापुढे बांगलादेशने टेकले गुडघे! श्रीलंकेसमोर विजयासाठी 165 धावांचे आव्हान