भारत आणि पाकिस्तान देशातील क्रिकेटप्रेमींव्यतिरिक्त जगभरातील क्रिकेटप्रेमीही भारत-पाकिस्तान सामन्यासाठी उत्सुक असतात. आशिया चषक 2023 स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात भारत-पाकिस्तान संघ आमने-सामने आले होते. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द झाला. आता भारत-पाकिस्तान संघात दुसरा सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचा त्रिफळा उडवला होता. आता या दोघांविषयी पाकिस्तानातून मोठे विधान आले आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) हा डावखुऱ्या गोलंदाजाविरुद्ध अनेकदा बाद झाला आहे. शाहीन आफ्रिदी यानेही त्याला अनेकदा बाद केले आहे. भारत-पाकिस्तान संघात 2 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यातही रोहितने शाहीनविरुद्ध खेळण्यासाठी खूपच सराव केला होता. तरीही शाहीन रोहितची विकेट घेण्यात यशस्वी ठरला. अशात रोहित विरुद्ध शाहीन यांच्याविषयी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला अख्तर?
रोहित शर्मा याने विश्वचषक 2019मध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात 140 धावांची झंझावाती खेळी साकारली होती. अशात चाहत्यांना आशा आहे की, 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यातही रोहित शाहीनचा चांगल्याप्रकारे सामना करताना दिसेल. अशातच अख्तरने रोहितच्या खेळण्याच्या तंत्राविषयी भाष्य केले आहे. त्याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना 2 सप्टेंबर रोजी रोहितच्या बाद होण्याच्या पद्धतीविषयी मत मांडले.
अख्तर म्हणाला, “हा रोहित शर्मा, तो रोहित शर्मा नाहीये. हा त्याचा स्टंट डबल आहे. शाहीन त्याच्या डोक्यात बसला आहे. मी कधीच त्याला आपला स्टान्स बदलताना पाहिले नाही, पण तिथे काय सुरू होते? त्याने स्टान्स बदलला, बॅटला चेंडू लागला नाही आणि त्रिफळाचीत बाद झाला. शाहीन त्याच्या डोक्यात बसला आहे. हाच भारत-पाकिस्तान सामन्याचा दबाव असतो, जो खेळाडूंवर असतो.”
रोहित-शाहीनचा आमना-सामना
रोहित आणि शाहीन यांच्यात आतापर्यंत 4 वेळा आमना-सामना झाला आहे. यादरम्यान रोहितने शाहीनचे एकूण 42 चेंडू खेळले आहेत. यामध्ये त्याने 73.80च्या स्ट्राईक रेटने आणि 15.50च्या सरासरीने 31 धावा केल्या आहेत. तसेच, तो दोन वेळा बाद झाला आहे. रोहितने शाहीनच्या चेंडूवर आतापर्यंत एकूण 4 चौकार आणि 1 षटकारही मारला आहे. आता आगामी सामन्यात काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (asia cup 2023 this cricketer said shaheen afridi is subconsciously in rohit sharma s mind before ind vs pak match)
हेही वाचाच-
विश्वचषक संघातून बाहेर पडलेल्या शिखर धवनने घेतला महाकालचा आशीर्वाद, ‘खिलाडी’ अक्षय कुमारही दिसला सोबत
‘हा तर निर्लज्जपणा…’, IND vs PAK सामन्यासाठीच्या राखीव दिवसावर भडकला भारतीय दिग्गज, बोर्डांनाही झापलं