भारतीय संघ 2025 च्या आशिया कपची ट्रॉफी मिळवण्यासाठी बराच काळ उत्सुक आहे. ही ट्रॉफी सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या ताब्यात आहे. बीसीसीआयने आधी हा मुद्दा एसीसीसमोर मांडला होता, आणि आता आयसीसीच्या बैठकीतही बीसीसीआयने तोच मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावरून एक मोठी अपडेट समोर आली आहे. आयसीसीने टीम इंडियाला ट्रॉफी परत मिळवून देण्याबाबत मोठे विधान केले आहे.
दुबईमध्ये (7 नोव्हेंबर) रोजी आयसीसीची बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयने सांगितले की, चॅम्पियन बनूनही आजपर्यंत त्यांना आशिया कप 2025 ची ट्रॉफी मिळालेली नाही. यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांना जबाबदार ठरवले आहे. आयसीसीने म्हटले की, दोन्ही क्रिकेट मंडळे खेळासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, त्यामुळे बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी या वादावर चर्चा करावी. तसेच आयसीसीने हा मुद्दा सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा सल्लाही दिला आहे, ज्यामुळे शक्य तितक्या लवकर भारतीय संघाला त्यांचा किताब मिळू शकेल.
आयसीसीच्या या बैठकीचा अधिकृत अजेंडा आशिया कप 2025 ची ट्रॉफी नव्हता. त्यामुळेच बैठकीनंतर जाहीर झालेल्या निवेदनात या वादाबाबत काहीही उल्लेख करण्यात आला नाही. मात्र, आयसीसी हा वाद सोडवण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे.
28 सप्टेंबर रोजी आशिया कप 2025 ची अंतिम सामना खेळला गेला होता. त्यानंतरपासून भारत या ट्रॉफीची प्रतीक्षा करत आहे. स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी गृह मंत्री मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता, त्यानंतर नकवी स्वतःच ती ट्रॉफी घेऊन निघून गेले होते.






