कोणत्याही खेळाडूची एखाद्या खेळासाठीची क्रेझ कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकते, याचं उदाहरण नुकतंच समोर आलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी एका खेळाडूनं चक्क त्याच्या बोटाचा बळी दिला आहे!
या खेळाडूचं नावं आहे मॅट डॉसन. तो ऑस्ट्रेलियाच्या हॉकी टीमचा सदस्य आहे. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी या 30 वर्षीय खेळाडूच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचं ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न धोक्यात आलं होतं. यानंतर त्यानं डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर बोटाचा वरचा भाग कापण्याचा निर्णय घेतला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक संघाचा सदस्य असलेल्या डॉसनसमोर बोटाला प्लास्टर लावणे किंवा बोटाचा काही भाग कापणे, असे दोन पर्याय होते. जर त्यानं प्लॅस्टर लावण्याचा निर्णय घेतला असता, तर त्याला कदाचित ऑलिम्पिकला मुकावं लागलं असतं. मात्र त्याचा ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा पक्का निर्धार असल्यानं त्यानं दुसरा पर्याय निवडला. डॉसनवर या आठवड्यात शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर तो आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे.
याबाबत बोलताना डॉसन म्हणाला की, त्याच्या बोटाचा वरचा भाग कापणे, हा त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय होता. हे त्याच्यासाठी मोठं आव्हान होतं. ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक कॉलिन बॅच यांनी डॉसनच्या ऑलिम्पिकसाठीच्या वचनबद्धतेचं कौतुक केलं आहे. बॅच म्हणाले, “हा असा निर्णय आहे, ज्यासाठी एखादा कोच खेळाडूला भाग पाडू शकत नाही. मी त्याच्या जागी असतो तर कदाचित हे करू शकलो नसतो.”
टोकियो ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा बेल्जियमकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव झाला होता. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये संघ 27 जुलै रोजी 2016 च्या चॅम्पियन अर्जेंटिनाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैला सुरू होऊन 11 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या या चॅम्पियन संघावर अदानी ग्रुपची नजर, लवकरच विकत घेणार मालकी हक्क
हार्दिक पांड्याचं भविष्य धोक्यात! टीम इंडिया पाठोपाठ मुंबई इंडियन्सचंही कर्णधारपद जाणार?
निवड समितीचा योग्य निर्णय, रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघातून वगळण्याची 3 कारणं जाणून घ्या