आयपीएल २०२२ मध्ये नव्याने सहभागी होणारा संघ लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज आवेश खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कोलकाता नाइट रायडर्सचा युवा अष्टपैलू वेंकटेश अय्यरही दिसत आहे. या दोघा युवा खेळाडूंनी अरबी ट्यूनवर आधारीत गाने ‘कुथु-हलामिथी हबीबी’ या गाण्यावर डान्स केला आहे. आवेशने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
आवेश खान (Avesh Khan) आणि वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) या दोघांनीही व्हिडिओत जबरदस्त डान्स स्टेप्स केल्या आहेत. २३ सेकंदांचा हा व्हिडिओ एका दिवसातत जवळपास १.५ लाख लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर ३५ हजारांपेक्षा जास्त चाहत्यांनी लाइक्स दिल्या आहेत, तसेच शकडो कमेंट्सही आल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवनेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे. सूर्यकुमारने कमेंटमध्ये अनेक ईमोजी टाकल्या आहेत.
२५ वर्षीय वेगवान गोलंदाज आवेश खानने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “सर्वात हॉट ट्रेंड वापरला. अरबी कुथु हबीबी” आवेशने ईशान किशन आणि हरप्रीत ब्रार यांनाही कॅप्शनमध्ये टॅग करून व्हिडिओ शुट करण्यासाठी क्रेडिट दिले आहे.
मध्य प्रदेशचा युवा खेळाडू आवेशने नुकतेच आयपीएल लिलाव इतिहासात स्वतःचे नाव नोंदवले आहे. मागच्या महिन्यात पार पडलेल्या आयपीएल मेगा लिलावात आवेश खानला १० कोटी रुपयांमधअये लखनऊ सुपर जायंट्सने खरेदी केले होते. आवेश आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला होता.
https://www.instagram.com/reel/CbNf6s_AKn0/?utm_source=ig_web_copy_link
अष्टपैलू वेंकटेश अय्यरने मागच्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये वेंकटेश मध्यप्रदेश संघासाठी खेळतो. त्याने मागच्याच हंगामात आयपीएमध्ये पदार्पण केले होते. मागच्या हंगामातील त्याचे जबरदस्त प्रदर्शन पाहून त्याला भारतीय संघात संधी दिली गेली. त्याने आतापर्यंत १० आयपीएल सामने खेळले आणि यामध्ये ४ अर्धशतकांच्या मदतीने ३७० धावा केल्या. त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्स संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचू शकला होता.
दुसरीकडे आवेश खानचा विचार केला, तर हा गोलंदाज आतापर्यंत आयपीएलच्या २० सामन्यांमध्ये खेळला आहे आणि यामध्ये २९ विकेट्स घेतल्या आहेत. मेगा लिलावावेळी त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले नसले, तर त्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत आवेशला आंतरराष्ट्रीय पदार्पणची संधी मिळाली होती.