भारत देशातील मोठ्या शहारांपासून ते अगदी खेडोपाड्यांपर्यंत एकाहून एक जबरदस्त प्रतिभावंत सापडतात. त्यातही क्रिकेटवेड्या म्हटल्या जाणाऱ्या भारतात प्रतिभाशाली क्रिकेटपटूंची भरमार असल्याचे दिसून येते. मात्र फार क्वचित जणांना भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळते. यासाठी प्रतिभा आणि अथक परिश्रमांबरोबर थोडीफार नशीबाचीही साथ असावी लागते. सध्या अशाच एका प्रतिभाशाली पठ्ठ्याचे नशीब चमकले आहे. ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात त्या पठ्ठ्याला संधी देण्यात आली आहे. हा पठ्ठ्या अजून कोण नसून २७ वर्षीय ‘अक्षर पटेल‘ आहे.
गोलंदाजी अष्टपैलू अक्षर पटेल याने भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील वनडे आणि टी२० सामने खेळले आहेत. परंतु अद्याप त्याला कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र नुकत्याच बीसीसीआयने पहिल्या दोन कसोटींसाठी घोषित केलेल्या संघात अक्षरला स्थान देण्यात आल्याने त्याचे कसोटी पदार्पणाचे स्वप्नही लवकरच पूर्ण होणार आहे.
अक्षरने पाहिली होती मोठा इंजिनियर बनण्याची स्वप्ने
खरे तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बऱ्याच क्रिकेटपटूंना लहानपणीपासून क्रिकेटची आवड असल्याचे आपण ऐकले आहे. त्यानुसार कळत्या वयापासून मोठा झाल्यावर आपल्या देशाकडून क्रिकेट खेळण्याचे त्यांचे स्वप्न असते. परंतु अक्षरला लहान असताना क्रिकेटमध्ये अजिबात रस नव्हता. गुजरातच्या नाडियाद शहरात जन्मलेल्या अक्षरला मोठे झाल्यानंतर इंजिनियर बनायचे होते. अक्षरही त्याच्या स्वप्नाप्रमाणे अभ्यासात चांगला हुशार होता. दहावीपर्यंत वर्गात नेहमी त्याचा पहिला किंवा दुसरा क्रमांक येत असे.
एके दिवशी अक्षरचा वर्गमित्र धिरन कंसारा याने शालेय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याचा त्याला हट्ट केला. त्यावेळी पहिल्यांदा अक्षरने क्रिकेट खेळले आणि उत्तम कामगिरीही केली. पुढे जेव्हा अक्षरचे वडील राजेश पटेल यांना आपल्या मुलातील क्रिकेट प्रतिभेविषयी सुगावा लागला. तेव्हा त्यांनी त्याला जवळच्या क्रिकेट क्लबमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. परंतु अक्षर क्रिकेट सरावास चालले असल्याचे खोटे सांगून आपल्या मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळत असायचा. पुढे हळूहळू त्याच्या आजीने त्याच्या मनात क्रिकेटची आवड निर्माण केली.
अक्षर सोडणार होता क्रिकेट
२०१० मध्ये अक्षरची १९ वर्षांखालील गुजरात संघात निवड झाली होती. यावेळी दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान घरी असताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्याच्या पायाला ८-१० टाके पडले होते. यामुळे तो १९ वर्षांखालील क्रिकेटच्या पूर्ण हंगामातून बाहेर झाला होता. यादरम्यान अक्षरने आपण आता कधीच या दुखापतीतून पूर्णपणे बरे होणार नसल्याची भिती मनात बाळगली आणि क्रिकेट सोडून देण्याचा निर्णय घेतला. परंतु यावेळीही त्याच्या आजीने त्याला दुखापतीवर मात करण्यात मदत केली आणि पुन्हा क्रिकेटची ओढ लावली.
जिवलग आजीच्या स्वप्नांसाठी झटला अक्षर
अगदी आपल्या वडिलांच्या सांगण्यावरुनही अक्षरने क्रिकेटला जास्त गांभीर्याने घेतले नव्हते. परंतु त्याचा आपल्या आजीवर खूप जीव होता. अक्षरच्या वडिलांप्रमाणे त्याच्या आजीचेही स्वप्न होते की, आपण आपल्या नातवाला भारतीय संघाच्या जर्सीत पाहावे. यातूनच अक्षरला क्रिकेटविषयी प्रेरणा मिळाली होती. परंतु दुर्दैवाने अक्षरला भारतीय संघाच्या जर्सीत पाहण्यापुर्वीच त्याच्या आजीने जगाचा निरोप घेतला. त्यावेळी म्हणजेच २०१४ मध्ये अक्षर भारतीय वनडे संघात निवड झाल्याने बांग्लादेश दौऱ्यावर होता. या कारणामुळे त्याला आपल्या लाडक्या आजीच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता आले नव्हते. परंतु त्यावेळीच अक्षरने मनाशी गाठ बांधली होती की, तो आपल्या आजीचे स्वप्न पूर्ण करून दाखवेल.
अक्षरची क्रिकेट कारकिर्द
सन २०१३ हे वर्ष अक्षरच्या क्रिकेट कारकिर्दीला एक वेगळे वळण देणारा कालावधी ठरला. २०१३-१४ हंगामात रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये त्याने ७ सामने खेळत ४६.१२च्या सरासरीने ३६९ धावा केल्या होत्या. सोबतच २३.५८च्या सरासरीने २९ विकेट्सची चटकावल्या होत्या. यासह पूर्ण हंगामात गुजरात संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा तो तिसरा खेळाडू ठरला होता. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे नशीब चमकले आणि आयपीएलसह भारतीय संघाची दारेही त्याच्यासाठी खुली झाली.
जून २०१४ मध्ये अक्षरने वनडे तर जुलै २०१५ मध्ये टी२० पदार्पण केले. आजवर ३८ वनडे सामन्यात ४५ विकेट्स आणि १८१ धावांची कामगिरी केली आहे. तसेच ११ टी२० सामन्यात ९ विकेट्स आणि ६८ धावा नोंदवल्या आहेत. याव्यतिरिक्त किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने ९७ सामन्यात ८० विकेट्स आणि ९१३ धावा केल्या आहेत.
संबंधित लेख-
भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत केवळ ‘या’ दोन खेळाडूंनाच करता आली त्रिशतकी खेळी
कमालीच्या फॉर्ममध्ये आहे ‘हा’ इंग्लंडचा खेळाडू; भारतीय संघासाठी ठरु शकतो सर्वात धोकादायक