भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी20 विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत भारताने थरारक विजय मिळवला. या सामन्यानंतर माजी भारतीय फिरकीपटू आर. अश्विननं मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विननं सांगितलं की अधिकृतरित्या संजू सॅमसनला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला असला तरी त्याच्या मते या सामन्यात सर्वात मोठं योगदान अक्षर पटेलचं होतं.
अश्विन म्हणाला, “जर मी गौतम गंभीर किंवा सूर्यकुमार यादव असतो, तर ज्याला मॅन ऑफ द मॅच दिला आहे त्याच्याकडून तो परत घेऊन मी अक्षर पटेलला दिला असता.” त्यांच मत आहे की टी20 क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीच्या चमकदार कामगिरीमुळे अनेकदा क्षेत्ररक्षणाचं महत्त्व दुर्लक्षित केलं जातं. मात्र या सामन्यात अक्षर पटेलने घेतलेले महत्त्वाचे कॅच भारताच्या विजयासाठी निर्णायक ठरले.
विशेषतः विल जॅक्सचा घेतलेला कॅच पाहून अश्विन खूप प्रभावित झाला. तो म्हणाला, “विल जॅक्सचा तो कॅच पाहिल्यानंतर मला अक्षर पटेलला मॅन ऑफ द मॅच द्यावंसं वाटत होतं.” अश्विनच्या मते जॅक्स त्या वेळी उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि मोठे फटके खेळत होता. जर तो कॅच सुटला असता, तर सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलू शकत होतं. त्यामुळे संजू सॅमसनच्या दमदार खेळीला खऱ्या अर्थाने फायदा अक्षरच्या त्या कॅचमुळेच झाला, असंही त्याने नमूद केलं.
या कामगिरीचं ऐतिहासिक महत्त्व सांगताना अश्विनने क्रिकेट इतिहासातील काही मोठ्या क्षणांची आठवण करून दिली. 1975 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात विवियन रिचर्ड्स यांना त्यांच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणासाठी मॅन ऑफ द मॅच देण्यात आला होता. तसेच 1983 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात कपिल देव यांनी घेतलेल्या ऐतिहासिक कॅचने सामना पलटला होता. अश्विनच्या मते अक्षर पटेलच्या क्षेत्ररक्षणानेही तसाच जादुई परिणाम निर्माण केला.
अश्विनने हेही स्पष्ट केलं की भारतीय संघाने या सामन्यात अनेक गोष्टी योग्य केल्या. संजू सॅमसनची फलंदाजी आणि जसप्रीत बुमराहची गोलंदाजी महत्त्वाची होतीच, पण अक्षर पटेलच्या चपळ क्षेत्ररक्षणाशिवाय भारताचा विजय कठीण झाला असता. शेवटी त्याने विश्वास व्यक्त केला की भारतीय संघ तिसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकण्याच्या दिशेने पुढे जात आहे.






