अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळला. याबरोबरच ४ सामन्यांची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. या कसोटी मालिका विजयात अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेलचा मोठा वाटा राहिला.
याच कसोटी मालिकेतून कसोटीमध्ये पदार्पण करणाऱ्या अक्षरने तीन कसोटीत २७ विकेट्स घेण्याचा कारनामा केला. याबरोबरच त्याने काही विक्रम आपल्या नावे केले.
अक्षरने गाजवले पदार्पण
अक्षरने चेन्नईला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पदार्पण करताना पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने अहमदाबादला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या आणि दुसऱ्या डावात त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर अहमदाबादलाच झालेल्या चौथ्या कसोटीत त्याने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या.
त्यामुळे त्याने या कसोटी मालिकेत मिळून ३ सामन्यात १०.५९ च्या सरासरीने २७ विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने ४ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला
यासह तो पदार्पणाच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आला आहे. तसेच त्याने दिलीप दोषी यांच्याशी बरोबरी केली आहे. दोषी यांनी देखील त्यांच्या कसोटी पदार्पणाच्या मालिकेत २७ विकेट्स घेतल्या होत्या. या यातील दोषी आणि अक्षरच्या पाठोपाठ शिवलाल यादव (२४), आर अश्विन (२२) आणि वेंकटराघवन (२१) हे गोलंदाज आहेत.
‘हा’ कारनामा करणारा तिसरा गोलंदाज
कसोटी कारकिर्दीतील पहिल्या ३ सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अक्षरने ऑस्ट्रेलियाच्या रॉडनी हॉग यांची बरोबरी करत तिसरा क्रमांक पटकावला आहे. हॉग यांनीही त्यांच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यात २७ विकेट्स घेतल्या होत्या. या यातील अव्वल क्रमांकावर भारताचे नरेंद्र हिरवाणी असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पहिल्या तीन कसोटीत ३१ विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे चार्ल्स टर्नर असून त्यांनी पहिल्या तीन कसोटीत २९ विकेट्स घेतल्या होत्या.
चारवेळा अक्षरचा पंच
अक्षरने पहिल्या तीन कसोटी सामन्यात ४ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे पहिल्या तीन कसोटीत सर्वाधिकवेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल क्रमांकावर आला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर नरेंद्र हिरवाणी आणि शिवराकृष्णन हे आहेत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या ३ सामन्यात प्रत्येकी ३ वेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या होत्या.
याशिवाय अक्षर पटेल हा पहिला असा भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याने त्याच्या पहिल्या तीनही कसोटी सामन्यात एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट अँड कंपनीची भरारी! इंग्लंडवरील विजयाने जागतिक क्रमवारीत गाठले अव्वल स्थान
भारत कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरताच विराटचा कपिल, गांगुली धोनीच्या पंक्तीत समावेश
‘मॅन ऑफ द सीरिज’चा मान अश्विनच्या पारड्यात, सचिन-सेहवागलाही सोडलं पिछाडीवर