न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाचा वाईट काळ अजूनही संपायचे नाव घेईना. न्यूझीलंडमध्ये आगमन केल्यानंतर पाकिस्तान संघाचे १० खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर सुरू झालेल्या टी२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता कसोटी मालिकेआधी पाकिस्तानी संघ आणि चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली. कर्णधार बाबर आझम आणि अनुभवी सलामीवीर इमाम उल हक हे पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध असणार नाहीत.
बाबर आणि इमाम खेळणार नाहीत पहिला कसोटी सामना
उभय संघांमध्ये सुरू असलेल्या टी२० मालिकेतून बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी दुखापतीमुळे माघार घेतली होती. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तानला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याच वेळी, टी२० मालिकेनंतर होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात हे दोन्ही अनुभवी खेळाडू खेळू शकणार नाहीत.
याबाबत, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, “बाबर आणि इमाम अजूनही सरावासाठी मैदानात उतरले नाहीत. संघाचे फिजियो दोघांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. ख्राईस्टचर्च येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत ते सहभागी होतील की नाही, याबाबत नंतर कळविण्यात येईल.”
बाबर आझमच्या उजव्या अंगठ्याला, तर इमाम उल हकच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. मागील आठवड्यात क्वीन्सटाऊन येथे सराव करताना त्यांना दुखापती झाल्या होत्या.
मोहम्मद रिझवान करेल पाकिस्तानचे नेतृत्त्व
पाकिस्तान संघाने पहिल्या कसोटीसाठी इम्रान बट याचा १७ सदस्यीय संघात समावेश केला आहे. पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यादरम्यान पहिली कसोटी २६ डिसेंबरपासून माउंट माऊंगनुई येथे खेळवली जाईल. यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान या सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्त्व करेल. पाकिस्तानचे कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्त्व करणारा रिझवान ३३ वा खेळाडू बनेल. बाबर आझमच्या अनुपस्थितीत फिरकीपटू शादाब खान टी२० मालिकेत पाकिस्तानचे नेतृत्त्व करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ‘ही’ रणनीती वापरा; गौतम गंभीरचा अजिंक्य रहाणेला सल्ला
‘गेल स्टॉर्म’ पुन्हा येणार; ‘या’ स्पर्धेतून ख्रिस गेल करणार पुनरागमन
…म्हणून धोनीच्या शेतातील भाज्यांची किंमत आहे स्वस्त; घ्या जाणून