पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमच्या बॅटमधून गेल्या बऱ्याच काळापासून धावा निघालेल्या नाहीत. मात्र असं असून देखील तो आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी कायम आहे.
जानेवारी 2023 पासून बाबरनं कसोटीच्या 13 डावात केवळ 275 धावा केल्या. याच दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या जो रूट आणि न्यूझीलंडच्या केन विल्यमसननं एक हजाराहून अधिक धावा ठोकल्या आहेत. जानेवारी 2023 पासून रूटनं 30 डावांत 1502 धावा केल्या. तर विल्यमसननं 32 डावात 1175 धावा केल्या आहेत. दोघांची सरासरी 55 च्या वर आहे. बाबर सोबत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलनं देखील या काळात 39 च्या सरासरीनं 625 धावा ठोकल्या आहेत.
बाबर आझमनं जानेवारी 2023 पासून आतापर्यंत 7 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यानं 21च्या मामूली सरासरीनं 275 धावा केल्या. या दरम्यान तो एकदाही 50 धावांचा आकडा गाठू शकला नाही. असं असून देखील बाबर क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबरनंतर स्टीव्ह स्मिथ आणि रोहित शर्माचा क्रमांक लागतो, ज्यांची सरासरी अनुक्रमे सरासरी 39 आणि 43 आहे.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बाबर आझम सपशेल अपयशी ठरला. पहिल्या डावात तो धावांचं खातंही उघडू शकला नाही. तर दुसऱ्या डावात त्यानं केवळ 22 धावा केल्या. या डावातही त्याला शून्यावर जीवदान मिळालं होतं.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीनं जानेवारी 2023 पासून खेळल्या गेलेल्या 11 कसोटी डावांमध्ये 288 धावा केल्या आहेत. तर भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनं या कालावधीत 9 डावात 57 च्या सरासरीने 397 धावा केल्या आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजानं देखील 16 डावात 513 धावा केल्या. तर वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू जेसन होल्डरच्या नावे 19 डावात 31च्या सरासरीनं 461 धावा आहेत. असं असलं तरी, फलंदाजीच्या क्रमवारीत या खेळाडूंच नाव कुठेही नाही, तर बाबर आझम अजूनही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
हेही वाचा –
पाकिस्तान क्रिकेट रसातळाला! 3 महिन्यांत झाले 3 लाजिरवाणे पराभव
पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीला राग अनावर, संघाला कानपिचक्या देत म्हणाला…
कॅरेबियन पॉवर! रोमॅरियो शेफर्डसमोर वर्ल्ड कप उपविजेता संघ ढेपाळला