कराची। पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना बुधवारी (१६ मार्च) अनिर्णित राहिला. नॅशनल स्टेडियम, कराची येथे पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ५०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने अखेरच्या दिवसाच्या शेवटच्या षटकापर्यंत ७ बाद ४४३ धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम याने शानदार दीडशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने एक मोठा विक्रमही केला (Pakistan vs Australia).
सामन्याच्या चौथ्या डावात बाबर आझमने (Babar Azam) ४२५ चेंडूत २१ चौकार आणि १ षटकार मारताना १९६ धावा केल्या. त्याला कारकिर्दीतील पहिले द्विशतक करण्यासाठी केवळ ४ धावा हव्या असताना नॅथन लायनने मार्नस लॅब्यूशानेच्या हातून झेलबाद केले. पण असे असले, तरी तो कसोटी क्रिकेटमध्ये सामन्याच्या चौथ्या डावात सर्वोच्च खेळी करणारा कर्णधार ठरला आहे (Highest score by captains in the fourth inning in a Test).
बाबर आझमने १९६ धावांची खेळी करताना कसोटीत चौथ्या डावात सर्वोच्च धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत इंग्लंडच्या मायकल अर्थरटन यांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. अर्थरटन यांनी १९९५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात इंग्लंडचा कर्णधार म्हणून नाबाद १८५ धावांची खेळी केली होती. या यादीत १७६ धावांच्या खेळीसह बेवर काँगडन तिसऱ्या आणि नाबाद १७३ धावांच्या खेळीसह दिग्गज डॉन ब्रॅडमन चौथ्या स्थानी आहेत.
याशिवाय बाबर आझमने ही १९६ धावांची खेळी करताना तब्बल ६०३ मिनिटे फलंदाजी केली. त्यामुळे तो ६०० किंवा त्यापेक्षा अधिक मिनिटे कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात फलंदाजी करणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी मायकल अर्थरटनने (Michael Atherton) १९९५ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे चौथ्या डावात नाबाद १८५ धावांची खेळी करताना ६४३ मिनिटे फलंदाजी केली होती.
कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात सर्वोच्च धावांची खेळी करणारे कर्णधार
१९६ धावा – बाबर आझम (पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२२)
१८५* धावा – मायकल अर्थरटन (इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, १९९५)
१७६ धावा – बेवन काँगडन (न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, १९७३)
१७३* धावा – डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, १९४८)
महत्त्वाच्या बातम्या –
लो जी हम आ गए! ‘यलो आर्मी’सोबत जोडला गेला जडेजा, सीएसकेने शेअर केला आगमनाचा Video
व्वा! मागे धावत हरमनप्रीतचा शानदार ‘हवाई’ झेल, कोलांट्या खाल्यानंतरही सोडला नाही चेंडू- Video
बाबर आझमची रेकॉर्डब्रेक खेळी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९६ धावांची खेळी करताना रचले ३ मोठे विक्रम