---Advertisement---

टी२० मालिकेतील एकतर्फी विजयानंतर कसोटीतही पाकिस्तानची विजयी सुरुवात, बांगलादेशवर ८ विकेट्सने सोपा विजय

On: मंगळवार, नोव्हेंबर 30, 2021 7:38 PM
---Advertisement---

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवण्यात आला. पाहुण्या संघाने पहिल्या कसोटीत बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव केला. बांगलादेशचे २०२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पूर्ण केले. अझहर अली (२४) आणि बाबर आझम (१३) नाबाद राहिले. पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांनी बाद होण्यापूर्वीच आपल्या संघाचा विजय निश्चित केला होता. तत्पूर्वी पाकिस्तानने टी२० मालिकेतही एकतर्फी विजय मिळवला होता.

पाकिस्तान संघाच्या शानदार गोलंदाजीसमोर बांगलादेशची फलंदाजी डळमळीत झाली. पाकिस्तानने दुसऱ्या डावात बांगलादेशला १५७ धावांत रोखले. विजयासाठी २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आबिद अली आणि अब्दुल्ला शफीक यांनी पहिल्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाकिस्तानने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या, परंतु छोट्या लक्ष्यामुळे सहज विजय मिळवला.

पाकिस्तानचा सलामीवीर आबिद अलीला सामनावीराचा किताब देण्यात आला. आबिद अलीने पहिल्या डावात शानदार शतक (१३३) झळकावले होते, तर दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना ९१ धावा केल्या होत्या. आबिदने दोन्ही डावात एकूण २४ चौकार मारले.

तत्पूर्वी बांगलादेशकडून दुसऱ्या डावात लिटन दासने सर्वाधिक ५९ धावा केल्या. तसेच यासिर अलीने ३६, सैफ हसन १८, मुशफिकुर रहीम १६ आणि नूरुल हसनने १५ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ५ बळी घेतले. साजिद खानला तीन आणि हसन अलीला दोन गडी बाद करण्यात यश मिळाले.

असा राहिला पहिला डाव
नाणेफेक जिंकत बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशकडून लिटन दासने दमदार शतक झळकावले तर मुशफिकर रहीमचे शतक थोडक्यात हुकले. लिटन दास ११४ धावांवर बाद झाला तर मुशफिकर रहीमने ९१ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. मेहदी हसनने नाबाद ३८ धावांची खेळी केली. अशाप्रकारे बांगलादेश संघाने पहिल्या डावात ३३० धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून हसन अलीने ५ आणि फहीम अश्रफने २ बळी घेतले.

प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने पहिल्या डावात २८६ धावा केल्या होत्या. त्यामुळे बांगलादेश संघाला ४४ धावांची आघाडी मिळाली होती. पण बांगलादेशला याचा फायदा घेता आला नाही आणि त्यांचा दुसरा डाव अवघ्या १५७ धावांवर गडगडला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

WTC Point Table: बांगलादेशला पछाडत पाकिस्तानचा भारताला ‘दे धक्का’, पण अव्वलस्थानी मात्र ‘या’ संघाची दहशत

शिखरचा ‘गब्बर’ स्टाईल डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर लावतोय आग, एकदा पाहाच

अबब! क्रिकेटविश्वातील फक्त ‘या’ २ संघांनी कसोटी सामन्याच्या एका डावात चोपल्यात ९०० हून जास्त धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---