भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे खेळला गेलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासह भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला होता, पण एका दिवसानंतर संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानने मंगळवारी (३० नोव्हेंबर) बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजय प्राप्त केल्यानंतर, भारताला मागे टाकत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत श्रीलंका १०० टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तान ६६.६६ टक्के गुणांसह दुसऱ्या, भारत ५० टक्के गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या कसोटीत पाकिस्तानने बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवण्यात आला. पाहुण्या संघाने पहिल्या कसोटीत बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव केला. बांगलादेशचे २०२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच पूर्ण केले. पाकिस्तानकडून अझहर अली (२४) आणि बाबर आझम (१३) नाबाद राहिले.
भारताला गुणांमध्ये झाला तोटा
दुसरीकडे कानपूर येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पाचव्या दिवशी अनिर्णित राहिला. या सामन्यात न्यूझीलंडकडून पदार्पण करणाऱ्या रचिन रवींद्रने दमदार खेळ दाखवत सामना अनिर्णित केला. त्याने एजाज पटेलसह शेवटच्या ५२ चेंडूंचा सामना केला आणि भारताला विकेट घेण्यापासून रोखले. भारताने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या होत्या. यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात २९६ धावा केल्या. भारताने दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित केला. न्यूझीलंडला विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य मिळाले होते. न्यूझीलंड संघाने ९ विकेट्सवर १६५ धावा करत सामना अनिर्णित राखला.
या निकालासह, भारतीय संघाची मालिकेत १-० ने आघाडी घेण्याची संधी चुकली, परंतु जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतही भारतीय संघाचे नुकसान झाले. भारतीय संघाने संपूर्ण १२ गुण जिंकण्याची संधी दवडली, तर न्यूझीलंडने सामना अनिर्णित राखत खात्यात ४ गुणांची भरती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शिखरचा ‘गब्बर’ स्टाईल डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर लावतोय आग, एकदा पाहाच
अबब! क्रिकेटविश्वातील फक्त ‘या’ २ संघांनी कसोटी सामन्याच्या एका डावात चोपल्यात ९०० हून जास्त धावा
‘तो का खेळतोय?’ चाहत्यांकडून ‘या’ भारतीय खेळाडूला संघाबाहेर करण्याची होतेय मागणी